Chanakya niti on money management : पैसे कमवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती भरपूर मेहनत घेते. पण, एकदा तुमच्याकडे पैसा आला आणि तो जर तुमच्या योग्यवेळी उपयोगात आला नाही किंवा तुम्हाला त्याचा उपयोग करता आला नाही. तर असा पैसा हा तुमच्या शत्रू सारखा असतो. त्यामुळे पैशांचं योग्य नियोजन करणे खूप गरजेचे असते. तर याचबद्दल आपण चाणक्य नीतीमधून जाणून घेणार आहोत.

आचार्य चाणक्य यांना विद्वान, अर्थशास्त्र, नीतीशास्त्राचे जनक मानले जातात. त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये त्यांनी जीवनातील अशा अनेक पैलूंचे स्पष्टीकरण दिले आहे, जे प्रत्येकासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे, चाणक्यांची काही तत्त्वे आपल्या जीवनात अंगीकारणे खूप फायदेशीर ठरू शकते. तर आज आपण स्वतःचा पैस केव्हा शत्रू ठरू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत…

चुकीच्या गोष्टींवर खर्च

एखादी व्यक्ती स्वतःचे पैसे चुकीच्या गोष्टींवर खर्च करत असेल. काही लोकांना दिखावा करायलाही आवडतो आणि यामुळे त्यांच्याकडून गरज नसणाऱ्या वस्तूंवर नकळतपणे पैसा खर्च केला जातो. त्यामुळे चाणक्यांच्या मते अशाप्रकारे स्वतःचे पैसेच आपला सर्वात मोठा शत्रू ठरू शकतात.

मोठे संकट

काही व्यक्ती आपल्या छंदांवर व चैनीच्या वस्तूंवर गरजेपेक्षा जास्त खर्च करतात. त्यामुळे गरजेच्या वेळी पैसे पुरत नाहीत. कारण – अशा व्यक्तींना बचत करण्याची सवय नसते. त्यामुळे अचानक गरज भासल्यास त्यांच्याकडे पुरेसे पैसा नसतो आणि त्यांना इतरांवर आर्थिक मदतीसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे तणाव तर येतो आणि आर्थिक मदतीसाठी कर्ज सुद्धा काढावे लागते. म्हणूनच, आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाने आपला पैसा कधीही चुकीच्या कामांसाठी वापरू नये.

पैशांचा योग्य वापर कसा करावा?

आचार्य चाणक्यांच्या मते, जर एखादी व्यक्ती स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी कमाईचा पैसा वापरत असेल, तर तिचा पैसा एका मित्रापेक्षा कमी नाही. आचार्य चाणक्य असेही म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या भविष्यासाठी बचत केली पाहिजे, जेणेकरून कठीण काळात पैसा उपयोगी पडेल.

पैशांची बचत कशी करावी?

अनेक प्रयत्न करूनही काही जणांकडे पैसा शिल्लक राहत नाही. चाणक्य म्हणतात की, ही परिस्थिती टाळण्यासाठी, अनावश्यक खर्च थांबवून भविष्यासाठी नियोजन करावे, पैसे वाचवण्यासाठी उत्पन्नाची गुंतवणूक करून अनावश्यक दिखावा सुद्धा टाळला पाहिजे; जेणेकरून पैसा हातात टिकून राहील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)