Chanakya Niti on Money : आचार्य चाणक्य यांनी ‘चाणक्य नीती’ ग्रंथातून अनेक शिकवण दिल्या आहेत, ज्या आजही प्रत्येकासाठी तितक्यात उपयोगी पडतात. जर लोकांनी त्यांचे पालन केले. तर आयुष्यात तुमची कधीही फसवणूक होऊ शकत नाही. कधीकधी आपण असे निर्णय घेतो ज्यामुळे भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते. यापैकी एक म्हणजे विचार न करता कोणालाही पैसे उधार देणे. अनेकदा जेव्हा लोक कोणाला पैसे उधार देतात, तेव्हा ते शक्य तितक्या लवकर पैसे परत करतील अशी अपेक्षा करतात. पण, बऱ्याच वेळा पैसे कधीच परत मिळत नाहीत.
आचार्य चाणक्य यांच्या मते, काही लोकांना पैसे उधार देणे टाळावे. कारण अशा लोकांना पैसे दिल्यास ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे तुमचे मेहनतीने कमावलेले पैसे अडकू शकतात. अशा वेळी समोरची व्यक्ती कितीही विनंती करत असली, तरी विचारपूर्वकच पैसे द्यावेत. कोणत्या लोकांना पैसे उधार देऊ नयेत चला, जाणून घेऊया.
फसवणूक करणारी व्यक्ती
जर तुम्ही अशा व्यक्तीला पैसे उधार दिले ज्याने भूतकाळात तुमची फसवणूक केली आहे, तर तुम्हाला तुमचे पैसे कधीही परत मिळणार नाहीत. अशी व्यक्ती आपल्या शब्दावरून मागे फिरू शकते आणि व्यक्तीकडून तुमचे पैसे परत मिळण्याची अपेक्षा करू नये. कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी, नेहमी त्यांच्या वागणुकीबद्दल आणि मागील व्यवहारांबद्दल चौकशी करा.
लोभी व्यक्ती
लोभी व्यक्ती दुसऱ्याचे पैसे स्वतःचेच समजते. तुम्ही अशा व्यक्तींपासून नेहमी दूर राहावे. अशा व्यक्तीला पैसे उधार देण्यापूर्वी दोनदा विचार करणे उत्तम राहील. आचार्य चाणक्य सांगतात की, लोभामुळे एखादी व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी इतरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू शकते आणि अशा परिस्थितीत, ती व्यक्ती तुमच्याकडून घेतलेले पैसे परत करणार नाही.
मूर्ख किंवा अज्ञानी व्यक्ती
मूर्ख किंवा अज्ञानी व्यक्ती उधार घेतलेले पैसे लगेच खर्च करते आणि ते परत करू शकत नाही. अशा व्यक्तीला पैसे उधार देऊ नका, नाहीतर ते तुम्हाला कधीच परत मिळणार नाहीत. आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख व्यक्तीमध्ये आर्थिक बाबी गांभीर्याने घेण्याची समज नसते, ज्यामुळे ती व्यक्ती कोणाच्याही पैशांचे संरक्षण करू शकत नाही.
अहंकारी व्यक्ती
अहंकारी व्यक्ती स्वतःच्या चुका सहज मान्य करत नाही आणि इतरांप्रती असलेली जबाबदारीही नीट पार पाडत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला पैसे उधार दिल्यास ती पैसे परत करण्याची जबाबदारी गांभीर्याने घेईलच असे नाही. म्हणूनच, कोणालाही पैसे देण्यापूर्वी ती व्यक्ती तुमच्या विश्वासाचा आणि मदतीचा आदर करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आचार्य चाणक्यांच्या मते, गर्विष्ठ व्यक्तीला पैसे उधार देणे टाळावे.
खोटं बोलणारी व्यक्ती
आचार्य चाणक्य सल्ला देतात की, खोटारड्या व्यक्तीबरोबर कोणताही आर्थिक व्यवहार करताना तुम्ही विशेष सावधगिरी बाळगावी. अशी व्यक्ती तुमचे पैसे कधी नाकारेल हे तुम्ही सांगू शकत नाही. खोटारडा कधीकधी जाणूनबुजून खोटे बोलू शकतो आणि तुम्ही दिलेले पैसे स्वीकारण्यास नकार देऊ शकतो.जर तुम्ही कोणाला पैसे उधार देणार असाल, तर त्यांच्यामध्ये हे गुण नाहीत याची खात्री करा, अन्यथा तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार नाहीत.
