Chanakya Niti: उद्योजकाला अनेकदा सर्वगुणसंपन्न असावं लागतं. एकाच वेळी अनेक कामं सांभाळणं काही सोपं नसतं. व्यवसायाची रणनीती, संसाधनांचं व्यवस्थापन, नेतृत्व, प्रशासन आणि त्याचबरोबर अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारीही त्याच्यावर असते. अशा वेळी मार्गदर्शनासाठी आचार्य चाणक्यांपेक्षा योग्य व्यक्ती कोण असू शकते?

ज्यांनी एका गरीब मुलाला घडवून भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा सम्राट बनवलं! जर तुम्ही व्यवसाय करत असाल, तर चाणक्य नीतीमधील या पाच गोष्टी नक्की शिकायला हव्यात.

योजना कायमची यशस्वी होईपर्यंत गुप्त ठेवा

श्श… हे गुपित आहे-जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते गुपितच राहू द्या. जादूचे प्रयोग पाहताना लोक आश्चर्यचकित का होतात, कधी विचार केला आहे का? कारण त्यामागचं रहस्य त्यांना आधी माहिती नसतं. जादूगार प्रयोग करण्यापूर्वी त्याचं रहस्य कधीच सांगत नाही, त्यामुळेच तो अधिक रंजक वाटतो.

हे चाणक्यांपेक्षा चांगलं कोण जाणणार? त्यांनी सांगितलं आहे की, आपली योजना पूर्ण होईपर्यंत ती गुप्त ठेवावी. याचा उल्लेख अध्याय २, श्लोक ७ मध्ये करण्यात आला आहे. विशेषतः जर तुम्ही स्टार्टअप सुरू करत असाल, तर हा धडा नेहमी लक्षात ठेवा.

शिकणं कधीही थांबवू नका

शिकणं ही आयुष्यभर सुरू राहणारी प्रक्रिया आहे. आणि उद्योजकांसाठी तर ते आणखी महत्त्वाचं आहे. चाणक्य नीतीच्या अध्याय ८ मध्ये त्यांनी सांगितलं आहे की, तुम्ही कितीही मोठ्या कुटुंबातून आला असाल किंवा व्यवसायिक घराण्यात जन्माला आला असाल, तरी शिकणं आवश्यक आहे. अध्याय २ मध्ये ते म्हणतात, “एकही दिवस असा जाऊ देऊ नका की ज्यामध्ये तुम्ही एखादा श्लोक, अर्धा श्लोक, चतुर्थांश श्लोक किंवा किमान एक अक्षरही शिकलात नाही.” म्हणून सतत शिकत राहा, अगदी इलॉन मस्क आणि वॉरेन बफे यांच्यासारखं.

कोणावर विश्वास ठेवायचा, हा देखील व्यवसायातील महत्त्वाचा निर्णय आहे

व्यवसायात तुम्ही एकटे सर्व काही करू शकत नाही. यशस्वी होण्यासाठी इतरांची साथ लागते. पण कोणावर विश्वास ठेवायचा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

चाणक्य याबाबत अगदी स्पष्ट आहेत. त्यांच्या मते, चुकीचा साथीदार हा उघड शत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतो. कारण शत्रू दिसतो, पण चुकीचा विश्वासू माणूस नकळत संकटात ढकलतो.

चाणक्य नीतीच्या अध्याय २ मधील श्लोक ६, ९ आणि १९ मध्ये त्यांनी आंधळा विश्वास ठेवण्याचे परिणाम सांगितले आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या लोकांना नोकरी देता किंवा प्रशासनात ठेवता, त्यांचे हेतू कंपनीसाठी चांगले आहेत याची खात्री करा.

गरज पडेल तेव्हा कठोर भूमिका घ्या

तुम्ही नवीन उद्योजक असाल किंवा अनुभवी, काही वेळा कठोर निर्णय घ्यावेच लागतात. सहकारी असोत किंवा भागीदार, काही संवाद कठीण असतात. अशा वेळी ठाम राहणं गरजेचं असतं. अर्थात, आदर राखून.

चाणक्य नीतीच्या अध्याय ९, श्लोक १० मध्ये म्हटलं आहे की, विष नसलेला सापसुद्धा स्वतःला विषारी असल्याचा आभास निर्माण करून स्वतःचं रक्षण करू शकतो. त्यामुळे गरज पडेल तेव्हा कठोर आणि ठाम भूमिका घेणं आवश्यक आहे.

भीती समजून घ्या, पण धैर्य दाखवा

व्यवसाय करताना अडचणी येणारच. त्या कधी आणि कशा येतील, हे सांगता येत नाही. भीती ही प्रत्येकामध्ये असते. तिच्याशी लढण्यापेक्षा तिला समजून घ्या.

तुमच्या मनात अनेक शंका आणि भीती असू शकतात. पण त्या कशा हाताळता, हे महत्त्वाचं आहे. चाणक्यांच्या मते, भीतीवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिचा थेट सामना करणं.

चाणक्य नीतीच्या अध्याय ३ मध्ये म्हटलं आहे, “जे नेहमी सतर्क राहतात, तेच खऱ्या अर्थाने निर्भय असतात.”

जेव्हा भीती वाटते, तेव्हा तिच्यापासून पळू नका. ती का वाटते, तिच्यामागचं कारण समजून घ्या. मग विचारपूर्वक निर्णय घ्या. अशा प्रकारे भीती ही कमकुवतपणा न राहता योग्य निर्णय घेण्यासाठी उपयुक्त माहिती ठरू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)