Chanakya Niti: प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते की त्यांच्या घरात प्रेम, विश्वास आणि शांतता कायम राहावी. पण अनेकदा नात्यांमध्ये दुरावा एखाद्या मोठ्या कारणामुळे नाही, तर छोट्याशा चुकीमुळे सुरू होतो. अनेक लोक भावनेच्या भरात आपल्या घरातील खासगी गोष्टी इतरांना सांगतात. पण नंतर काही लोक त्याच माहितीचा चुकीचा वापर करू शकतात. म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये गोपनीयतेला कुटुंबाची सर्वात मोठी ताकद मानली आहे.
त्यांच्या मते, घरातील प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगणे शहाणपणाचे नसते. उलट त्यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होऊ शकतात. योग्य आणि अयोग्य लोकांची वेळेत ओळख झाली, तर कुटुंबातील आनंद, सन्मान आणि परस्परांतील विश्वास दीर्घकाळ टिकून राहू शकतो.
चाणक्य नीती : कुटुंब मजबूत ठेवण्यासाठी विवेक आणि गोपनीयता महत्त्वाची
आचार्य चाणक्य यांना भारतातील सर्वात बुद्धिमान विचारवंतांपैकी एक मानले जाते. त्यांनी फक्त राजकारण आणि राज्यकारभाराबाबतच नाही, तर चांगले आयुष्य जगण्यासाठीही अनेक महत्त्वाचे विचार सांगितले आहेत. त्यांच्या नीती आजही लोकांना नातेसंबंध, वागणूक आणि योग्य निर्णय घेण्यास मार्गदर्शन करतात.
चाणक्य यांच्या मते, घरातील काही गोष्टी फक्त कुटुंबापुरत्याच मर्यादित असाव्यात. घरातील भांडणं, आर्थिक परिस्थिती किंवा भविष्यातील योजना बाहेरच्या लोकांना कळल्या, तर त्याच गोष्टी पुढे जाऊन तणाव आणि वादाचे कारण बनू शकतात.
काही लोकांना इतरांच्या खासगी गोष्टी जाणून घेण्याची खूप आवड असते. ते सहानुभूती दाखवत हळूहळू घरातील माहिती मिळवतात आणि नंतर ती इतरांपर्यंत पोहोचवतात. अनेकदा ते गोष्टी वाढवूनही सांगतात, त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. चाणक्य नीतीनुसार अशा लोकांना घरातील निर्णय किंवा अडचणींबद्दल कधीही सांगू नये. यामुळे तुमची प्रतिष्ठा कमी होऊ शकते आणि नातेसंबंधांमध्येही विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो.
मत्सरी लोक कधीच योग्य सल्ला देत नाहीत
दुसऱ्यांच्या आनंदाचा हेवा करणारे लोक नुकसान करू शकतात
प्रत्येकजण तुमच्या आनंदात आनंदी असेलच, असे नाही. काही लोक वरून मैत्री दाखवतात, पण मनातून तुमच्या यशाचा आणि सुखी कुटुंबाचा हेवा करतात. असे लोक सल्ला देण्याच्या नावाखाली असे काही सांगू शकतात, ज्यामुळे घरात मतभेद वाढू शकतात. चाणक्य यांच्या मते, मत्सरी माणूस कधीच निष्पक्ष विचार करत नाही. त्यामुळे घरातील महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अशा लोकांचा सल्ला घेणे टाळलेलेच चांगले.
रागीट आणि अविचारी लोकांना सल्लागार बनवू नका
घरातील वाद अनेकदा शांतपणे आणि समजूतदारपणे सोडवावे लागतात. पण जे लोक छोट्या-छोट्या गोष्टींवर लगेच रागावतात किंवा पूर्ण गोष्ट न समजता निर्णय देतात, ते परिस्थिती आणखी बिघडवू शकतात. चाणक्य नीती सांगते की, कठीण काळात शांत स्वभावाचे आणि विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या लोकांचा सल्ला जास्त उपयोगी ठरतो. रागाच्या भरात घेतलेला निर्णय संपूर्ण कुटुंबासाठी अडचणी निर्माण करू शकतो.
स्वार्थी आणि लालची लोकांपासून दूर राहा
स्वार्थी लोक गरजेच्या वेळी साथ देत नाहीत
काही नाती फक्त स्वार्थासाठी टिकून असतात. जोपर्यंत त्यांचा फायदा होतो, तोपर्यंत ते सोबत राहतात. पण परिस्थिती बदलली की ते दूर होतात. अशा लोकांना घरातील आर्थिक परिस्थिती, मालमत्ता किंवा भविष्यातील योजना कळल्या, तर ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. चाणक्य यांच्या मते, घरातील आर्थिक माहिती आणि महत्त्वाचे निर्णय फक्त विश्वासू लोकांपुरतेच मर्यादित ठेवावेत. त्यामुळे अनावश्यक वाद आणि नुकसान टाळता येते.
अहंकारी आणि स्वतःची चूक न मानणाऱ्या लोकांपासूनही सावध राहा
जे लोक नेहमी स्वतःलाच बरोबर समजतात आणि इतरांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत, ते कोणताही वाद सोडवण्याऐवजी अधिक वाढवू शकतात. त्यांचा अहंकार अनेकदा तडजोड होऊ देत नाही. चाणक्य नीतीनुसार, घरात मतभेद झाल्यास अशा व्यक्तींना मध्ये पडू देऊ नये. योग्य तोडगा तोच काढू शकतो, जो दोन्ही बाजू शांतपणे ऐकून समजून घेतो.
घरातील शांतता टिकवण्यासाठी काय करावे?
चाणक्य यांच्या शिकवणीत प्रत्येकावर संशय घ्यावा असे सांगितलेले नाही. मात्र, कोणावर विश्वास ठेवायचा, हे विचारपूर्वक ठरवावे असे त्यांनी सांगितले आहे. घरातील भांडणं, आर्थिक व्यवहार, भविष्यातील योजना आणि वैयक्तिक गोष्टी फक्त पूर्ण विश्वास असलेल्या लोकांनाच सांगाव्यात. त्यामुळे घरातील शांतता, विश्वास आणि आनंद कायम राहण्यास मदत होते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
