Chanakya Niti on Downfall: आज १० जून २०२६, बुधवार. आज आपण चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या अशा गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या माणसाला हळूहळू बर्बादीकडे घेऊन जातात. चाणक्य नीतीमध्ये आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आजच्या काळातही योग्य मार्ग दाखवू शकतात आणि अनेक अडचणींपासून आपले संरक्षण करू शकतात.
आचार्य चाणक्य यांचे मत होते की, माणसाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे ज्ञान आणि इतरांशी असलेले चांगले वर्तन. मात्र अहंकार या दोन्ही गोष्टी सहज नष्ट करू शकतो. त्यांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला सर्वांत श्रेष्ठ समजू लागते, तेव्हा ती एकामागोमाग एक चुकीचे निर्णय घेऊ लागते. अशावेळी यश दूरच राहते आणि हळूहळू सर्व काही हातातून निसटू लागते. जाणून घ्या त्या ४ गोष्टी, ज्यांचा गर्व करणे कोणत्याही व्यक्तीला विनाशाच्या मार्गावर नेऊ शकते.
पैशाचा गर्व
एखाद्या व्यक्तीकडे आज पैसा आहे, याचा अर्थ तो कायमच राहील असे नाही. वेळ कधीही बदलू शकते. त्यामुळे हातात पैसा आला म्हणून इतरांना कमी समजू नये. जे लोक पैशाचा गर्व करतात, ते हळूहळू आपल्या जवळच्या लोकांचा विश्वास गमावतात. पैसा माणसाला सुखसोयी देऊ शकतो, पण इतरांचा आदर आणि सन्मान केवळ चांगल्या वागणुकीमुळेच मिळतो.
ज्ञानाचा गर्व
ज्ञान असणे आणि त्याचा गर्व असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जास्त शिक्षण किंवा अनुभव असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत आहे, असे होत नाही. आपण रोज काही ना काही नवीन शिकत असतो. जर एखादी व्यक्ती आपल्या ज्ञानाचा दिखावा करून इतरांना कमी लेखू लागली, तर लोक तिच्यापासून दूर जाऊ लागतात. आचार्य चाणक्य यांच्या मते, नेहमी नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवावी आणि इतरांचे मतही शांतपणे ऐकावे.
पद आणि सत्तेचा गर्व
एखाद्या व्यक्तीकडे मोठे पद असणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचा गर्व करणे योग्य नाही. चाणक्य नीतीनुसार नोकरी, सत्ता आणि जबाबदारी या कायम सारख्या राहत नाहीत. जर एखादी व्यक्ती आपल्या पदाचा किंवा सत्तेचा वापर करून इतरांना त्रास देत असेल किंवा त्याचा गर्व करत असेल, तर योग्य वेळी त्यालाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. चाणक्य नीतीनुसार सत्तेसोबत नम्रता असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सहज आणि सुरळीत होतात.
सौंदर्याचा गर्व
सौंदर्याचे अनेक प्रकार असतात. काहींची वाणी सुंदर असते, तर काहींचे विचार सुंदर असतात. काहींचे मन सुंदर असते, तर काही व्यक्ती दिसायला सुंदर असतात. सुंदर असणे चांगली गोष्ट आहे, पण त्याचा गर्व असणे योग्य नाही. माणसाची खरी ओळख त्याच्या स्वभावातून आणि वागणुकीतूनच होते. लोक दीर्घकाळ त्या व्यक्तीला लक्षात ठेवतात जी इतरांवर प्रेम करते आणि सर्वांशी आदराने वागते.
म्हणूनच चाणक्य नीती आपल्याला शिकवते की, आयुष्यात कितीही पैसा, ज्ञान, पद किंवा सौंदर्य मिळाले तरी माणसाने नेहमी नम्र राहावे. गर्वामुळे काही काळ आनंद मिळू शकतो, पण नम्रता आणि चांगला स्वभाव आयुष्यभर टिकणाऱ्या चांगल्या गोष्टी देऊन जातात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
