Chanakya Niti on Human Behaviour : माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख त्याच्या वर्तनातून होते. चांगले वर्तन केवळ इतरांवर चांगला प्रभाव पाडत नाही. तर त्या व्यक्तीचे संस्कार, ज्ञान, प्रतिष्ठाही दर्शवते. आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये वर्तनाला जीवनातील अत्यंत महत्त्वाचा गुण अगदी अलंकार मानले आहे. त्यांच्या मते, योग्य वागणूक आणि शिस्तबद्ध आचरण माणसाला यशाच्या मार्गावर घेऊन जाते. चाणक्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या अंगीकारल्यास व्यक्तीला समाजात मान-सन्मान मिळतो आणि प्रगती साधता येते. चला जाणून घेऊया, चाणक्यांच्या मते कोणते वर्तन माणसाला यशस्वी बनवते.
१. संकटकाळात असं वागा
तावद् भयेषु भेतव्यं यावद्भयमनागतम् ।
आगतं तु भयं दृष्टवा प्रहर्तव्यमशङ्कया ।।
चाणक्य नीतीतील हा श्लोक सांगतो की, संकट येण्यापूर्वी त्याबाबत सावध राहणे, त्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. मात्र, जेव्हा संकट प्रत्यक्ष समोर उभे राहते. तेव्हा घाबरून न जाता धैर्याने आणि पूर्ण आत्मविश्वासाने त्याचा सामना करावा. अडचणींपासून पळ काढण्याऐवजी, त्यांना दूर ठेवण्यासाठी, त्यांच्यावर ठामपणे मात करण्याचा प्रयत्न करावा. संकटकाळात हे वर्तन सर्वात फायदेशीर मानले जाते. कारण – एकदा का तुम्ही संकटकाळात घाबरलात तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत आणि परिस्थितीवरचे नियंत्रण गमावतात. त्यामुळे ते अडचणींना अधिक बळी पडतात. याउलट, शांत राहून धैर्याने परिस्थितीचा सामना करणारे लोक संकटातून मार्ग काढण्यात अधिक यशस्वी ठरतात.
२. खरे संस्कार असे कळतात
आचारः कुलमाख्याति देशमाख्याति भाषणम् ।
सम्भ्रमः स्नेहमाख्याति वपुराख्याति भोजनम् ।।
आचार्य चाणक्य या श्लोकातून सांगतात की, एखाद्या व्यक्तीचे वर्तन आणि आचार पाहून त्याच्या कुटुंबाची व संस्कारांची ओळख होते. व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतीवरून तो कोणत्या प्रदेशातील किंवा पार्श्वभूमीचा आहे, याचाही अंदाज येतो. तसेच, एखादी व्यक्ती इतरांशी किती आदराने व प्रेमाने वागते, यावरून तिच्या स्वभावाची आणि नातेसंबंधांबद्दलच्या दृष्टिकोनाची माहिती मिळते. शरीराची ठेवण आणि प्रकृती पाहून त्याच्या आहार-विहाराचाही अंदाज बांधता येतो. त्यामुळे माणसाने कुठेही राहिले तरी आपले वर्तन नम्र, सुसंस्कृत आणि आदरयुक्त ठेवावे. कारण सभ्य वागणूक हीच व्यक्तीच्या चांगल्या संस्कारांची आणि व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख असते.
