Chanakya Niti 5 Habits to Earn Respect in Society: आजच्या काळात प्रत्येकाला समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असते. लोकांनी आपला आदर करावा, आपल्या मताला किंमत द्यावी आणि आपण जिथे जाऊ तिथे आपल्याबद्दल चांगलं बोललं जावं, अशी अनेकांची इच्छा असते. पण हा मान-सन्मान नेमका कसा मिळवायचा? याचं उत्तर शेकडो वर्षांपूर्वीच आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात दिलं आहे.

चाणक्यांनी सांगितलेल्या काही साध्या, पण प्रभावी गोष्टी आजही तितक्याच महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यांच्या मते, माणसाची वागणूक, बोलण्याची पद्धत आणि इतरांशी असलेला व्यवहारच त्याला समाजात वेगळी ओळख मिळवून देतो. विशेष म्हणजे या गोष्टींसाठी पैसा किंवा मोठं पद आवश्यक नसतं. फक्त काही चांगल्या सवयी अंगीकारल्या तरी लोकांच्या मनात आपल्याबद्दल आदर निर्माण होऊ शकतो.

१) दिलेला शब्द पाळा

चाणक्यांच्या मते, कोणालाही वचन देणं सोपं असतं; पण ते पूर्ण करणं महत्त्वाचं असतं. जी व्यक्ती वेळेवर काम पूर्ण करते आणि दिलेला शब्द पाळते, त्या व्यक्तीवर लोकांचा विश्वास बसतो. एखाद्यानं तुमच्यावर विश्वास ठेवून खासगी गोष्ट सांगितली असेल, तर ती इतरांना न सांगणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विश्वासू व्यक्तीला समाजात आपोआप मान-सन्मान मिळतो.

२) फक्त बोलायचं नाही, समोरच्याचं ऐकायलाही शिका

अनेक लोकांना फक्त स्वतःचंच बोलायची सवय असते. पण, चाणक्य सांगतात की, चांगला संवाद म्हणजे समोरच्याचं मतही शांतपणे ऐकणं. जी व्यक्ती इतरांच्या विचारांनाही महत्त्व देते, त्याचं मतही लोक गंभीरपणे घेतात. इतरांचा आदर केल्यास समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होऊ शकते.

३) प्रत्येकाशी नम्रतेने वागा

समोरची व्यक्ती श्रीमंत आहे की गरीब, मोठ्या पदावर आहे की सामान्य माणूस… यावरून वागणूक बदलू नये, असं चाणक्य सांगतात. “धन्यवाद” म्हणणं, छोट्या गोष्टींसाठी मदत करणं किंवा अडचणीत शांत राहणं या सवयी माणसाचा मोठेपणा दाखवतात. नम्र स्वभाव असलेल्यांना लोक जास्त पसंत करतात.

४) शिकत राहणाऱ्या व्यक्तीला समाजात वेगळं स्थान मिळतं

चाणक्यांच्या मते, जो माणूस सतत नवीन गोष्टी शिकतो आणि स्वतःमध्ये सुधारणा करत राहतो, त्याला समाजात विशेष मान मिळतो. ज्ञानामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि लोक त्याच्याकडे आदराने पाहतात. त्याचबरोबर संयमित जीवन जगणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा अधिक प्रभावी बनते.

५) संगत आणि वाणी या दोन गोष्टी आयुष्य बदलू शकतात

चाणक्यांनी चांगल्या संगतीचं महत्त्वही स्पष्ट केलं आहे. चुकीच्या लोकांच्या सहवासामुळे माणसाचे निर्णय चुकू शकतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक आणि चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये राहावं. त्याचबरोबर बोलण्यात गोडवा असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण- वाणीच माणसाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते आणि त्याच्या ऱ्हासालाही कारणीभूत ठरू शकते.

आजच्या धावपळीच्या जगात लोक मोठेपणा दाखवण्यासाठी अनेक गोष्टी करतात. पण चाणक्य सांगतात की, खरी ओळख ही पैशानं नाही, तर स्वभाव आणि वागणुकीनं तयार होते. त्यामुळे जर समाजात मान-सन्मान हवा असेल, तर या छोट्या; पण प्रभावी सवयी आयुष्यात अंगीकारणं गरजेचं ठरू शकतं.