Chanakya Niti Important Signs of a Perfect Life Partner: आजच्या काळात प्रत्येकाला आपल्या आयुष्यात असा जोडीदार हवा असतो, जो प्रत्येक सुख-दुःखात साथ देईल, समजून घेईल आणि आयुष्यभर नातं जपेल. अनेक जण यालाच ‘सोलमेट’, असं म्हणतात. पण, आचार्य चाणक्यांच्या मते, केवळ प्रेम किंवा आकर्षण पुरेसं नसतं. एखादं नातं टिकण्यासाठी काही महत्त्वाचे गुण आणि विचारांची जुळवाजुळव असणंही तितकंच आवश्यक असतं.
चाणक्य नीतीनुसार, ज्या घरात शांतता असते आणि जिथे जोडीदार एकमेकांच्या विचारांचा आदर करतात, ते घरच खऱ्या अर्थानं सुखी मानलं जातं. बाहेरून सर्व काही सुंदर दिसत असलं तरी काही छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच योग्य जोडीदार ओळखताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात, हे जाणून घेणं आवश्यक ठरतं.
१. जीवनमूल्यांमध्ये एकवाक्यता असणं महत्त्वाचं
आचार्य चाणक्य सांगतात की, दोन व्यक्तींचे विचार आणि जीवन जगण्याची तत्त्वं पूर्णपणे वेगळी असतील, तर नात्यात सातत्यानं संघर्ष निर्माण होऊ शकतो. योग्य-अयोग्य याबाबत दोघांचं मत सारखं असणं महत्त्वाचं मानलं जातं. संकटाच्या काळात एकमेकांना साथ देण्यासाठी विचारांची समानता उपयोगी पडू शकते; अन्यथा छोट्या छोट्या गोष्टींवरूनही घरात वाद वाढू शकतात.
२. संवादाची पद्धत नातं मजबूत करू शकते
चाणक्य नीतीमध्ये गोड आणि संयमी वाणीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. जोडीदाराशी बोलताना फक्त शब्द नव्हे, तर बोलण्याची पद्धतही नात्यावर परिणाम करू शकते. सतत टोमणे मारणं, अपमानास्पद बोलणं किंवा इतरांसमोर कमी लेखणं यांमुळे नातं कमकुवत होण्याची शक्यता असते. त्याउलट शांतपणे संवाद साधणारी आणि चुका समजून घेणारी जोडी अधिक मजबूत मानली जाते.
३. वाद झाल्यानंतरच खरी परीक्षा सुरू होते
प्रत्येक नात्यात मतभेद होणं स्वाभाविक असतं. मात्र, ते कसे हाताळले जातात, यावरच नात्याचं भविष्य अवलंबून असू शकतं. चाणक्यांच्या मते, रागाच्या भरात घेतलेले निर्णय किंवा कठोर शब्द नात्याला दुखावू शकतात. वाद झाल्यानंतर शांतपणे तोडगा काढण्याची वृत्ती दोघांमध्ये असणं आवश्यक मानलं जातं. मतभेद चालतील; पण मनभेद वाढू नयेत, हेच नातं टिकविण्याचं गुपित मानलं जातं.
४. आयुष्याची ध्येयं वेगळी असली तरी दिशा समान असावी
आचार्य चाणक्य म्हणतात, दोन वेगळ्या दिशांना धावणारे घोडे रथ पुढे नेऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे जोडीदारांची स्वप्नं आणि भविष्याबद्दलचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असेल, तर पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. करिअर वेगळं असलं तरी आयुष्याकडून अपेक्षा आणि ध्येयांमध्ये समजूतदारपणा असणं आवश्यक ठरतं.
५. पैशांबाबतचा दृष्टिकोनही ठरू शकतो महत्त्वाचा
नात्यात प्रेम जितकं महत्त्वाचं असतं, तितकाच आर्थिक समजूतदारपणाही महत्त्वाचा मानला जातो. एक जण काटकसरी आणि दुसरा उधळ्या असेल, तर भविष्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. खर्च, बचत आणि आर्थिक नियोजन यांबाबतचं एकमत संसार अधिक स्थिर बनवू शकतं.
६. आवडी-निवडींचा आदर नातं अधिक घट्ट होण्यास साह्यभूत
दोघांच्या सगळ्याच आवडी सारख्या असतीलच, असं नाही; पण एकमेकांच्या छंद आणि आवडींचा आदर करणं महत्त्वाचं मानलं जातं. जोडीदाराच्या स्वप्नांना पाठिंबा देणं आणि त्याच्या आनंदात सहभागी होणं याांमुळे नातं अधिक सुंदर होऊ शकतं.
चाणक्य नीतीनुसार, खरा जोडीदार तोच मानला जातो; जो फक्त प्रेम करत नाही, तर समजून घेतो, साथ देतो आणि प्रत्येक परिस्थितीत नातं टिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे केवळ आकर्षणावर नातं उभं राहत नाही; तर विश्वास, आदर आणि समजूतदारपणा यांवरच मजबूत नात्याचा पाया उभा राहू शकतो.
