Chanakya’s Warning Stay Away from These 5 People: आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची माणसं वावरत असतात. काही जण आयुष्य घडवतात, तर काही नकळत आपल्या यशाच्या आड येतात. अशा लोकांना वेळेत ओळखलं नाही तर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, असा इशारा आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात दिला आहे.

चाणक्यांच्या मते, काही व्यक्ती वरून कितीही चांगल्या वाटल्या तरी त्यांच्या स्वभावामुळे त्या आपल्या आयुष्यात अडचणी निर्माण करू शकतात, त्यामुळे अशा लोकांपासून योग्य वेळी अंतर ठेवणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. जाणून घेऊया, चाणक्यांनी कोणत्या पाच प्रकारच्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

१. सतत खोटं बोलणारी व्यक्ती

चाणक्यांच्या मते, वारंवार खोटं बोलणाऱ्या व्यक्तीवर कधीच पूर्ण विश्वास ठेवू नये. अशा लोकांसाठी सत्यापेक्षा स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा असतो. गरज पडल्यास ते कोणालाही फसवू शकतात. ते समोर गोड बोलतात, पण वेळ आली की पाठीमागून वार करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत, त्यामुळे अशा व्यक्तींपासून योग्य अंतर ठेवणंच हिताचं ठरतं.

२. सतत स्तुती करणारे चापलूस लोक

जो प्रत्येक गोष्टीत तुमची स्तुती करतो, तो नेहमीच तुमचा हितचिंतक असेल असं नाही. चाणक्य सांगतात की, चापलूस माणूस स्वतःच्या फायद्यासाठी गोड बोलतो. तो तुमच्या चुका कधीच दाखवत नाही. उलट चुकीच्या निर्णयालाही पाठिंबा देतो. अशा लोकांच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवू नये.

३. प्रत्येक गोष्टीवर रागावणारी व्यक्ती

अतिशय रागीट स्वभावाचा माणूस स्वतःचं आणि इतरांचंही नुकसान करू शकतो. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. चाणक्यांच्या मते, सतत राग करणारी व्यक्ती स्वतःची नातीही टिकवू शकत नाही. अशा स्वभावाच्या लोकांपासून दूर राहिल्यास मानसिक शांतता टिकून राहते.

४. आळशी आणि काम पुढे ढकलणारे लोक

आळस हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. जे लोक सतत काम टाळतात आणि मेहनत करण्यापासून दूर पळतात, ते स्वतःही पुढे जात नाहीत आणि इतरांच्याही प्रगतीत अडथळा निर्माण करतात. चाणक्यांच्या मते, अशा लोकांच्या सहवासाचा परिणाम आपल्या विचारांवरही होऊ शकतो, त्यामुळे मेहनती आणि सकारात्मक लोकांचा सहवास अधिक फायदेशीर ठरतो.

५. फक्त स्वतःचाच विचार करणारी स्वार्थी व्यक्ती

चाणक्यांनी सर्वाधिक सावध राहण्याचा सल्ला स्वार्थी लोकांबाबत दिला आहे. अशा व्यक्ती प्रत्येक नात्यात स्वतःचा फायदा शोधत असतात. दुसऱ्यांच्या भावना, विश्वास किंवा अडचणी यांना त्यांच्यासाठी काहीच महत्त्व नसतं. गरज संपली की ते सहजपणे साथ सोडतात, त्यामुळे अशा व्यक्तींना वेळेत ओळखणं अत्यंत आवश्यक आहे.

चाणक्यांचा महत्त्वाचा संदेश

चाणक्य नीतीनुसार, माणसाची खरी ओळख त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या वागण्यातून होते, त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवण्याऐवजी त्याच्या स्वभावाचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. योग्य लोकांचा सहवास आयुष्य घडवतो, तर चुकीच्या लोकांची साथ आयुष्यभराचा पश्चात्ताप देऊ शकते. म्हणूनच चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी आजच्या काळातही तितक्याच महत्त्वाच्या मानल्या जातात.