Chanakya Niti For Happy Married Life : हसत्या-खेळत्या संसाराला उद्ध्वस्त करणाऱ्या कोणत्या चुका किंवा सवयी पती-पत्नीने टाळल्या पाहिजेत, याविषयी चाणक्यांनी महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. जर पती-पत्नी दोघांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले, तर नात्यात दुरावा येऊ शकतो. वैवाहिक आयुष्य हे रथाच्या दोन चाकांसारखे असते. त्यातील एका जरी चाकात अहंकार, असंतोष किंवा अविश्वासाची भावना निर्माण झाली, तर संसाराचा गाडा पुढे जाऊ शकत नाही. सुखी वैवाहिक जीवनासाठी कोणत्या ६ गोष्टींपासून दूर राहावे, ते जाणून घेऊयात:
१. वैयक्तिक गोष्टी इतरांशी शेअर करणे
चाणक्य नीतीनुसार, पती-पत्नीने त्यांच्यातील वैयक्तिक गोष्टी, एकमेकांच्या उणिवा किंवा मतभेद कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू नयेत. मग ती व्यक्ती तुमचा मित्र, नातेवाईक किंवा भाऊ-बहीण का असेना. तिसरी व्यक्ती मदत करण्याऐवजी पाठीमागे टिंगल-टवाळी करते किंवा परिस्थितीचा गैरफायदा घेते.
२. नात्यापेक्षा अहंकार मोठा असणे
नात्यात जेव्हा अहंकार किंवा घमंड प्रवेश करतो, तेव्हा प्रेम आणि विश्वास संपुष्टात येतो. स्वतःची चूक न मानणे, सतत स्वतःलाच योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे आणि जोडीदाराला कमी लेखणे हा वैवाहिक जीवनाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. त्यामुळे नात्यात नेहमी नम्रता असावी.
३. कडू आणि अपमानास्पद शब्द
धनुष्यातून सुटलेला बाण जसा परत येत नाही, तसेच मुखातून निघालेले शब्द परत घेता येत नाहीत. रागाच्या भरात बोललेले शब्द मनावर असा खोल घाव घालतात, जो कधीही भरून येत नाही. जे पती-पत्नी आपल्या बोलण्यावर संयम ठेवत नाहीत, त्यांच्या घरातील शांती आणि लक्ष्मी दोन्ही रुसून निघून जातात.
४. एकमेकांपासून गोष्टी लपवणे
वैवाहिक जीवनाचा पाया हा ‘विश्वास’ असतो. जेव्हा नात्यातील पारदर्शकता संपते आणि गोष्टी लपवल्या जातात, तेव्हा संशयाचा जन्म होतो. विनाकारण घेतलेला संशय चांगल्यात चांगले नातेही वाळवीसारखे पोखरून टाकतो.
५. विनाकारण होणारा उधळपट्टीचा खर्च
आचार्य चाणक्यांच्या मते, पती किंवा पत्नीने आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त आणि विनाकारण खर्च केल्यास घरात सतत वाद आणि तणाव राहतो. म्हणूनच कुटुंबाच्या समृद्धीसाठी आर्थिक बजेट ठरवूनच खर्च केला पाहिजे.
६. आदराची कमतरता
वैवाहिक आयुष्यात केवळ प्रेम असून चालत नाही, तर परस्परांबद्दल आदर असणे अत्यंत आवश्यक आहे. इतरांसमोर आपल्या जोडीदाराची टर उडवणे किंवा त्याचा अपमान करणे नात्याचा पाया कमकुवत करते. त्यामुळे पती-पत्नीने नेहमी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
