Chanakya Niti For Happy marriMed Life : प्रत्येक पती-पत्नीला वाटत असतं की आपलं वैवाहिक जीवन आनंदाने आणि प्रेमाने भरलेलं असावं. पण अनेकदा नकळतपणे आपण अशा काही चुका करतो ज्याचा थेट परिणाम आपल्या नात्यावर होतो. घराबाहेरच्या व्यक्तींशी बोलताना आपण ओघाओघाने काही अशा गोष्टी सांगून जातो, ज्या केवळ पती-पत्नीच्या बेडरूमपर्यंत किंवा घराच्या भिंतींच्या आतच राहणे आवश्यक असते. जर या खाजगी गोष्टी समाजासमोर किंवा नातेवाईकांसमोर उघड झाल्या, तर नात्यात केवळ दुरावाच येत नाही, तर लोक तुमच्या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायलाही मागे-पुढे पाहत नाहीत.आचार्य चाणक्यांनी सुखी वैवाहिक जीवनासाठी ४ अत्यंत महत्त्वाची सूत्रे सांगितली आहेत, जी प्रत्येक जोडप्याने पाळायलाच हवीत. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी…
१. आपसातील मतभेद स्वतःपुरतेच ठेवा
पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद किंवा भांडणे होणे स्वाभाविक आहे. परंतु, या गोष्टी कधीही इतरांसमोर सांगू नयेत. चाणक्य यांच्या मते, वैयक्तिक वाद सार्वजनिक केल्यामुळे इतर लोक तुमच्या नात्यात हस्तक्षेप करू लागतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते. अनेकदा यामुळे पती-पत्नीचे नाते तुटण्याची वेळही येऊ शकते. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका.
२. पैशांशी संबंधित गोष्टी कोणालाही सांगू नका
आचार्य चाणक्य यांनी पैशांच्या बाबतीतही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पती-पत्नी या दोघांनीही आपली कमाई (उत्पन्न), बचत आणि गुंतवणुकीची माहिती इतर लोकांना सांगू नये. यामुळे इतरांच्या मनात मत्सर किंवा ईर्ष्या निर्माण होऊ शकते आणि ते तुमच्यासाठी अडचणीचे कारण बनू शकतात.
३. पार्टनरचा कमकुवतपणा
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही उणिवा किंवा कमतरता नक्कीच असतात. आचार्य चाणक्य यांच्या मते, पती-पत्नीने एकमेकांच्या कमकुवत बाजू नेहमी लपवून ठेवल्या पाहिजेत आणि त्या कधीही दुसऱ्यांसमोर उघड करू नयेत. असे केल्याने वैवाहिक जीवनात आदर आणि विश्वास टिकून राहतो. पार्टनरची कमकुवतपणा इतरांना सांगून तुम्ही तुमच्याच लव्ह लाईफमध्ये तणाव वाढवू शकता.
४. खाजगी गोष्टी कोणाशीही शेअर करू नका
पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनात अनेक खाजगी आणि गोपनीय गोष्टी असतात, ज्या फक्त त्या दोघांनाच माहित असणे गरजेचे असते. या गोष्टी पती-पत्नीपुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजेत. चाणक्य यांच्या मते, अशा खाजगी गोष्टी इतरांशी शेअर केल्याने नात्याची प्रतिष्ठा आणि गोपनीयता धोक्यात येते. इतर लोक याचा चुकीचा फायदाही घेऊ शकतात.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
