Chanakya Niti For Marriage : लग्न हा आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. जर जीवनसाथी (लाईफ पार्टनर) योग्य आणि चांगला असेल, तर तुमचे आयुष्य आनंदाने भरून जाते. परंतु, जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीने आयुष्यात प्रवेश केला, तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका असतो. आचार्य चाणक्य यांनी शतकांपूर्वी आपल्या नीतींमध्ये लग्नाबाबत काही अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच कटू गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या आजच्या काळातही आपल्याला योग्य रस्ता दाखवण्याचे काम करतात. चाणक्य नीतीमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या लोकांशी लग्न करण्याचा निर्णय घाईघाईने न घेण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही अशा लोकांशी लग्न केले, तर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता खूप वाढते. जर तुम्हीही लग्नाचा विचार करणार असाल, तर चाणक्यांचे खालील ५ सल्ले एकदा वाचाच.
१. बाह्य सौंदर्याच्या मोहात पडू नका
आचार्य चाणक्यांच्या मते, तुम्ही कधीही केवळ चेहरा पाहून किंवा बाह्य सौंदर्यावर भुलून लग्नाचा निर्णय घेऊ नये. अनेकदा लोक सुंदर चेहरा पाहून विचार न करता, लग्नासाठी होकार देतात; पण नंतर त्यांचा हाच निर्णय आयुष्यभर पश्चात्तापाचे कारण बनतो. कोणत्याही माणसाचे खरे सौंदर्य त्याच्या मनात आणि त्याच्या विचारांमध्ये असते. जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि संस्कार चांगले नसतील, तर त्याचे बाह्य सौंदर्य खूप लवकर फिके वाटू लागते. त्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर भुलून निर्णय घेण्यापेक्षा माणसाचे मन आणि विचार पारखणे अधिक महत्त्वाचे आहे.
२. रागीट आणि कडू बोलणाऱ्या लोकांपासून दूर राहा
गोड बोलण्याने शत्रूलाही आपला मित्र बनवता येते, असे आपण अनेकदा आपल्या मोठ्यांकडून ऐकतो. परंतु, जी व्यक्ती नेहमी रागात असते आणि प्रत्येक छोट्या गोष्टीवर कडवट शब्दांचा वापर करते, ती व्यक्ती घराची शांतता पूर्णपणे नष्ट करते. चाणक्य नीतीनुसार, अशा व्यक्तीशी लग्न करण्यापूर्वी १०० वेळा विचार केला पाहिजे. कारण- ज्याचे स्वतःच्या रागावर नियंत्रण नसते, ती व्यक्ती कधीही तुमची काळजी घेऊ शकणार नाही. कडवट बोलणारे लोक केवळ तुमचे मनच दुखावणार नाहीत, तर समाजात तुमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचवू शकतात.
३. लोभी आणि पैशांच्या मागे धावणारे
आचार्य चाणक्यांच्या मते, लग्नाचे नाते हे पूर्णपणे विश्वास आणि प्रेमाच्या पायावर टिकलेले असते. ते कधीही धन-दौलतीवर अवलंबून नसते. चाणक्यांनी याविषयी सांगितले की, जे लोक अत्यंत लोभी असतात किंवा केवळ पैसा पाहून नाते जोडतात, ते तुमच्या वाईट काळात कधीही तुमची साथ देणार नाहीत. अशा लोकांसाठी नात्यापेक्षा तुमचा पैसा जास्त महत्त्वाचा असतो. उद्या जर तुमच्या आयुष्यात पैशांशी संबंधित अडचणी आल्या, तर हे लोक सर्वांत आधी तुमची साथ सोडू शकतात. त्यामुळे धनलोभी माणसापासून दूर राहणेच तुमच्यासाठी शहाणपणाचे ठरेल.
४. जे इतरांचा आदर-सन्मान करत नाहीत
एका चांगल्या जीवनसाथीची ओळख यावरूनही होते की, तो केवळ तुमच्याशीच नाही, तर इतरांशी कसा वागतो. चाणक्य म्हणतात की, जी व्यक्ती आपल्या आई-वडिलांचा, मोठ्यांचा किंवा समाजातील इतर लोकांचा आदर करीत नाही, ती तुम्हालाही कधीच खरा सन्मान देऊ शकणार नाही. लग्नाच्या बंधनात केवळ दोन व्यक्ती नाही, तर दोन कुटुंबेही एकमेकांशी जोडली जातात. जर समोरच्या व्यक्तीमध्ये तुमच्या कुटुबीयांबद्दल आदराची भावना नसेल, तर ती तुमच्या कुटुंबाला कधीही आपले मानू शकणार नाही आणि घरात नेहमी कलह राहील.
५. धर्म आणि चांगल्या कर्मांपासून दूर राहणारे
धर्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर त्याचा संबंध काय योग्य आणि काय अयोग्य याच्या समजूतदारपणाशी आहे. जी व्यक्ती चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवत नाही, नेहमी खोटे बोलते किंवा इतरांना फसवण्यात पटाईत असते, ती कधीही एक विश्वासू जीवनसाथी बनू शकत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा लोकांबरोबर आयुष्य घालवणे एखाद्या नरकापेक्षा कमी नसते. कारण- त्यांच्या वाईट सवयी एक ना एक दिवस तुम्हालाही मोठ्या संकटात टाकू शकतात. म्हणूनच लग्नापूर्वी माणसाचे चारित्र्य आणि त्याच्या सवयी चांगल्या प्रकारे जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
