Chanakya Niti For Happy Married Life : पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होणे ही सामान्य बाब आहे. अनेकदा पुरुषांची अशी तक्रार असते की, त्यांची पत्नी अयोग्य मागण्या करते, ज्यामुळे घरात सतत भांडणे होतात. पण चाणक्य यांच्या मते, प्रत्येक वेळी या समस्येचे मूळ फक्त पती-पत्नीच असतात असे नाही.

चाणक्यांच्या मते, स्त्रिया आपल्या मैत्रिणींच्या प्रभावाखाली पटकन येतात. त्यामुळे घरातील नको असलेला तणाव आणि वाद टाळण्यासाठी पतींनी आपल्या पत्नीला विशिष्ट प्रकारच्या मैत्रिणींपासून दूर ठेवले पाहिजे. चाणक्य यांनी कोणत्या प्रकारच्या मैत्रिणींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे, ते जाणून घेऊया.

१. वाईट वर्तणूक किंवा वाईट सवयी असलेल्या स्त्रिया

चाणक्य यांच्या मते, पतीने आपल्या पत्नीला वाईट सवयी किंवा संशयास्पद वर्तन असलेल्या स्त्रियांपासून दूर ठेवले पाहिजे. अशा स्त्रिया कौटुंबिक मूल्यांचा आदर करत नाहीत आणि त्यांची मैत्री घरात अडचणी निर्माण करू शकते.

२. संपत्तीचा आणि पैशांचा अहंकार असणाऱ्या स्त्रिया

जे लोक आपल्या श्रीमंतीचा गर्वा करतात आणि इतरांना कमी लेखतात, अशा स्त्रियांपासून पत्नीला दूर ठेवावे. अशा स्त्रियांना फक्त दिखावा करायला आवडतो. त्यांच्या संगतीमुळे पत्नीच्या मनात नको त्या इच्छा निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे घरातील शांतता भंग होऊ शकते.

३. जास्त रागीट असणाऱ्या स्त्रिया

खूप चिडचिड्या किंवा रागीट स्वभावाच्या स्त्रियांपासूनही दूर राहिले पाहिजे. अशा स्त्रिया छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे करतात. त्यांच्या संगतीचा वाईट प्रभाव पत्नीवर पडू शकतो, ज्यामुळे वैवाहिक नात्यात दुरावा आणि कटुता येऊ शकते.

४. द्वेष आणि मत्सर करणाऱ्या मैत्रिणी

जळफळाट किंवा ईर्ष्या करणाऱ्या स्त्रियांपासून पत्नीला नेहमी लांब ठेवावे. अशा स्त्रियांना इतरांचे सुख पाहावत नाही. त्या तुमच्यासमोर गोड बोलतात, पण पाठीमागे कारस्थान रचतात.

तुमची पत्नी अशा लोकांच्या संपर्कात असेल तर तुमच्या घरातील वैयक्तिक गोष्टी बाहेर जाऊ शकतात आणि त्याचा गैरफायदा घेऊन ते तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. आचार्य चाणक्य यांच्या या सल्ल्याचे पालन केल्यास तुम्ही कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करण्यापासून रोखू शकता.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)