Chanakya Niti: महिना संपायच्या आतच खिसा रिकामा होतो? कितीही कमावलं तरी पैसा हातात टिकतच नाही?” अशी तुमचीही तक्रार आहे का? मग सावधान! कारण केवळ अफाट पैसा कमावणे पुरेसे नसते, तर तो टिकवणे ही त्याहून मोठी कला आहे. यावर आचार्य चाणक्य यांनी शतकांपूर्वीच आर्थिक यशाचा असा एक ‘मॅजिक फॉर्म्युला’ सांगितला आहे, जो आजच्या काळातही तुम्हाला कंगाल होण्यापासून वाचवू शकतो. तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहावा असं वाटत असेल, तर आजच चाणक्यंचे ‘हे’ ४ नियम जाणून घ्या, नाहीतर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते!
१. उत्पन्नापेक्षा कमी खर्च करा
चाणक्यांच्या मते, जो व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो, तो हळूहळू कर्ज, मानसिक ताण आणि अपमानाचा बळी ठरतो. आजच्या आधुनिक जीवनशैलीत केवळ ‘दिखावा’ करण्याच्या नादात माणूस आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत चालला आहे. म्हणूनच, तुमच्या कमाईचा एक ठराविक भाग बचतीसाठी बाजूला ठेवा. हीच सवय भविष्यात तुमच्या आर्थिक सुरक्षिततेचा पाया बनते.
२. कमाईचे साधन प्रामाणिक असावे
चाणक्य नीती सांगते की, अन्याय, फसवणूक किंवा बेईमानीने कमावलेला पैसा शेवटी दुःखाचे कारण बनतो. असा पैसा मानसिक शांतता हिरावून घेतो आणि समाजातील प्रतिष्ठा देखील खराब करतो. आचार्य चाणक्य यांनी स्पष्ट लिहिलं आहे की, प्रामाणिक मार्गाने कमवलेला पैसाच शाश्वत सुख देतो आणि पिढ्यानपिढ्या समृद्धी टिकवून ठेवतो.
३. संकटकाळासाठी बचत
आयुष्य हे अनपेक्षित घडामोडींनी भरलेले आहे. आजारपण, व्यवसायातील तोटा किंवा अचानक उद्भवणारे आर्थिक संकट कधीही येऊ शकते. समजूतदार व्यक्ती नेहमी भविष्यासाठी पैशांची साठवणूक करतो, असे चाणक्य मानत होते. आजच्या आधुनिक भाषेत आपण याला ‘इमर्जन्सी फंड’ म्हणतो. संकटाच्या वेळी कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येऊ नये, म्हणून कमाईतील काही टक्के हिस्सा बाजूला ठेवणे हीच खरी बुद्धिमानी आहे.
४. पैशांचे योग्य नियोजन आणि गुंतवणूक
आचार्य चाणक्य यांच्या मते, केवळ पैसा साठवून ठेवणे पुरेसे नाही, तर तो योग्य ठिकाणी वापरणे देखील तितकेच गरजेचे आहे. शिक्षण, कौशल्य, व्यवसाय किंवा मालमत्तेमध्ये केलेली गुंतवणूक पैशांमध्ये वाढ करण्याचे माध्यम बनते. एकाच ठिकाणी पडून असलेला पैसा हळूहळू आपले मूल्य गमावतो. त्यामुळे पैशाला अशा ठिकाणी गुंतवा, जिथे तो तुमच्यासाठी काम करेल आणि तुमची संपत्ती वाढेल.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
