Five Life Lessons By Chanakya Niti For Chanakya Niti : अभ्यासात हुशार होऊन जीवनात उच्च स्थान प्राप्त करण्याचे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. पण, हे साध्य करण्यासाठी, केवळ पाठांतर पुरेसे नाही; जीवनात चांगले आचरण आणि शिस्त अंगीकारणे देखील महत्त्वाचे आहे. महान अर्थशास्त्रज्ञ आणि मार्गदर्शक, आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ‘नीतिशास्त्र’ या ग्रंथात विद्यार्थ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे श्लोक लिहून ठेवले आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात…
१. शिक्षणाचा खरा अर्थ
विद्या ददाति विनयं विनयाद्याति पात्रताम्।
पात्रत्वाद्धनमाप्नोति धनाद्धर्मं ततः सुखम्॥
म्हणजे शिक्षण सर्वप्रथम व्यक्तीला नम्रता प्रदान करते. ज्यांच्यामध्ये नम्रता असते, ते आपोआपच कर्तृत्व प्राप्त करतात. केवळ एक सक्षम व्यक्तीच योग्य मार्गाने पैसा कमवू शकते आणि त्या संपत्तीचा उपयोग समाजकल्याणासाठी करू शकते. यातून मिळणारा धडा असा आहे की, जर ज्ञान मिळवल्यानंतर तुमच्यात अहंकार निर्माण झाला, तर समजून घ्या की तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत नाही आहात.
२. ज्ञान हेच सर्वात मोठे सौंदर्य
रूपयौवनसंपन्ना विशाल कुलसम्भवाः।
विद्याहीना न शोभन्ते निर्गन्धा इव किंशुकाः॥
म्हणजे एखादं फूल अतिशय सुंदर आणि गडद लाल रंगाचे असते. पण, त्याला सुगंध नसतो. त्याचप्रमाणे, जर एखादी व्यक्ती खूप सुंदर, तरुण आणि अत्यंत श्रीमंत किंवा उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेली असेल. पण, तिच्यात ज्ञान आणि विद्वत्तेची कमतरता असेल, तर तिला समाजात खरा आदर मिळत नाही.
३. ज्ञानाला मिळतो सर्वत्र आदर
विद्वान् प्रशस्यते लोके विद्वान् गच्छति गौरवम्।
विद्या लभते सर्वं विद्या सर्वत्र पूज्यते॥
राजाचा आदर केवळ त्याच्या राज्यापुरता मर्यादित असतो. पण, विद्वान माणसाची स्तुती जगभर पसरते. ज्ञानाच्या आधारावर जीवनात सर्व काही मिळवता येते. म्हणूनच बुद्धिमान लोक नेहमी ज्ञान संचय करतात.
४. आदर्श विद्यार्थ्याची ५ वैशिष्ट्ये
श्लोक:काक चेष्टा बको ध्यानं श्वान निद्रा तथैव च।
अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंच लक्षणम्॥
आचार्य चाणक्यांनी विद्यार्थ्यांचे जीवन यशस्वी करण्यासाठी असे पाच नियम दिले आहेत, जे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केले पाहिजेत…
कावळ्यासारखी जिज्ञासा
ज्याप्रमाणे कावळा आपले ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यामध्ये काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आणि सतत प्रयत्न करण्याची सवय असली पाहिजे.
बगळ्यासारखी एकाग्रता
अभ्यास करताना तुमचे लक्ष बगळ्यासारखे असले पाहिजे, जो पाण्यात पूर्णपणे स्थिर राहतो आणि आपली नजर फक्त आपल्या माशावर (लक्ष्यावर) ठेवतो.
श्वानासारखी सतर्कता
विद्यार्थ्याची झोप खूप गाढ किंवा सुस्त नसावी. श्वानाप्रमाणे जराशा आवाजानेही जागे होण्याची सतर्कता तुमच्यात असली पाहिजे, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही.
संतुलित आहार
अति खाण्यामुळे आळस आणि सुस्ती येते, ज्यामुळे अभ्यासातील रस कमी होतो. म्हणून, विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्या गरजेनुसारच खावे.
अभ्यासावर लक्ष केंद्रित करा
याचा अर्थ घर सोडणे नव्हे, तर घरातील सुखसोयी, आरामशीर जीवन आणि सांसारिक आसक्तींपासून दूर राहून अभ्यासादरम्यान आपल्या कर्तव्यांवर लक्ष केंद्रित करणे होय.
