Chanakya Niti Never Give a Second Chance to These 3 People: एखाद्याला माफ करणं हा माणसाचा मोठा गुण मानला जातो. क्षमा केल्याने नाती टिकतात, मनातील कटुता कमी होते आणि संबंध अधिक घट्ट होतात. पण, प्रत्येक वेळी प्रत्येकालाच माफ करणं योग्य ठरतं का, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. अनेकदा आपल्या चांगुलपणाचा काही लोक गैरफायदा घेतात आणि पुन्हा पुन्हा तीच चूक करून आपल्यालाच दुखावतात.
अशा वेळी नेमकं काय करावं? समोरच्या व्यक्तीला आणखी एक संधी द्यावी की नाही? याबाबत आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, क्षमा हा मोठेपणाचा गुण असला तरी विचार न करता प्रत्येकालाच माफ करणं शहाणपणाचं लक्षण नाही. योग्य व्यक्तीला दिलेली दुसरी संधी नाते वाचवू शकते; पण चुकीच्या व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवणे भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण करू शकतं.
कोणत्या वेळी माफ करणं योग्य ठरू शकतं?
पहिल्यांदाच चूक झाली असेल, तर आचार्य चाणक्यांच्या मते, माणसाकडून चुका होणे स्वाभाविक आहे. एखाद्या व्यक्तीकडून पहिल्यांदाच नकळत चूक झाली असेल आणि त्याला त्याचा खरोखर पश्चात्ताप होत असेल, तर त्याला एक संधी देण्यात काहीच गैर नाही.
कधी अनुभवाचा अभाव, घाई-गडबड किंवा परिस्थितीमुळेही चुकीचे निर्णय घेतले जातात. अशा वेळी समोरची व्यक्ती स्वतःची चूक मान्य करून, ती सुधारण्याचा प्रयत्न करत असेल, तर कठोर भूमिका घेण्यापेक्षा समजून घेणं अधिक योग्य ठरू शकतं.
अनुभव कमी असलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करा
चाणक्यांच्या मते, लहान मुले, नव्याने काम सुरू केलेले कर्मचारी किंवा कमी अनुभव असलेल्या व्यक्तींकडून छोट्या-मोठ्या चुका होऊ शकतात. अशा वेळी त्यांना सतत शिक्षा करण्याऐवजी योग्य मार्गदर्शन करणे अधिक महत्त्वाचे आहे.
प्रत्येक व्यक्ती अनुभवातून शिकत असते. त्यामुळे जिथे सुधारण्याची संधी आहे, तिथे क्षमा आणि योग्य दिशा या दोन्ही गोष्टी आवश्यक असल्याचे चाणक्य सांगतात.
शिक्षा देण्याचा अधिकार असूनही क्षमा करणं
चाणक्यांच्या मते, खरी क्षमा तीच असते, जी शिक्षा देण्याची ताकद असूनही केली जाते. जर तुमच्याकडे एखाद्याला शिक्षा करण्याचा अधिकार असेल आणि त्याच्या प्रामाणिक पश्चात्तापामुळे तुम्ही त्याला सुधारण्याची संधी दिली, तर तो तुमचा कमकुवतपणा नसून परिपक्वतेचा पुरावा आहे.
अशा प्रकारचं संतुलित वर्तन कुटुंब, समाज आणि कार्यक्षेत्रात व्यक्तीचा सन्मान वाढवू शकतं.
कोणत्या व्यक्तींना वारंवार माफ करू नये?
फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा
आचार्य चाणक्य स्पष्ट सांगतात की, ज्याच्या स्वभावातच फसवणूक, कपट किंवा विश्वासघात आहे, अशा व्यक्तीला वारंवार माफ करणे धोकादायक ठरू शकते.
त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं आहे. सापाला कितीही दूध पाजले तरी त्याचे विष कमी होत नाही. त्याचप्रमाणे वाईट प्रवृत्तीची व्यक्ती योग्य संधी मिळताच पुन्हा नुकसान करू शकते. त्यामुळे अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवणेच हिताचे ठरू शकते.
सतत तीच चूक करणाऱ्यांवर सहज विश्वास ठेवू नका
जर एखादी व्यक्ती वारंवार तीच चूक करत असेल, प्रत्येक वेळी माफी मागत असेल; पण तिच्या वागण्यात कोणताही बदल दिसत नसेल, तर अशा व्यक्तीला पुन्हा पुन्हा माफ करणे योग्य नाही, असे चाणक्य सांगतात.
खरा पश्चात्ताप शब्दांत नव्हे, तर कृतीत दिसतो. जर वागणूक बदलत नसेल, तर समोरची व्यक्ती तुमच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेत असल्याचं ते संकेत मानतात.
विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींना दुसरी संधी देताना विचार करा
चाणक्यांच्या मते, विश्वास हा कोणत्याही नात्याचा सर्वांत मजबूत पाया असतो. जर एखाद्या व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला, पाठीमागून नुकसान केले किंवा विश्वासघात केला, तर त्याच्यावर पुन्हा पूर्वीसारखा विश्वास ठेवताना सावध राहणे आवश्यक आहे.
एकदा तुटलेला विश्वास पुन्हा तसाच निर्माण करणे अत्यंत कठीण असते. त्यामुळे अशा वेळी भावनांपेक्षा विवेकाला प्राधान्य देणे अधिक योग्य ठरू शकते.
आयुष्यात संतुलन राखणं हीच खरी नीती
आचार्य चाणक्यांच्या शिकवणीचा सर्वांत महत्त्वाचा संदेश म्हणजे संतुलन. प्रत्येक चुकीवर कठोर शिक्षा करणे योग्य नाही आणि प्रत्येक वेळी डोळेझाक करून माफ करणेही योग्य नाही.
कुटुंब, मैत्री, नोकरी किंवा समाजातील कोणतेही नाते असो, समोरच्या व्यक्तीचा हेतू, तिचे वर्तन आणि चूक किती गंभीर आहे, हे समजून घेतल्यानंतरच निर्णय घ्यावा, असे चाणक्य सांगतात.
ते आणखी एक महत्त्वाचे उदाहरण देतात. जंगलात सर्वांत सरळ झाड आधी तोडले जाते. त्याचप्रमाणे प्रत्येकाला सहज माफ करणारी, अतिशय भोळी व्यक्ती अनेकदा स्वार्थी लोकांच्या जाळ्यात अडकते. त्यामुळे क्षमा हा गुण असला तरी तो विवेक, अनुभव व योग्य विचार यांच्या आधारावरच वापरणे अधिक हिताचे ठरते.
