Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये व्यक्तीला आपलं जीवन घडवण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते याविषयी मार्गदर्शन केलं आहे. ज्यांचं पालन केल्यास कोणत्याही माणसाचं जीवन बदलू शकतं. चाणक्य नीतीमधील विचार आजही लोकांना योग्य मार्ग दाखवीत आहेत.
चाणक्य नीतीनुसार, काही घरांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह इतका जास्त असतो की, तिथे माता लक्ष्मी स्वतःहून येते. चला तर मग जाणून घेऊया, त्यांच्यात असे कोणते गुण असतात, ज्यांच्यामुळे त्यांच्या घरात नेहमी सुख, समृद्धी आणि वैभव नांदत असते.
१. गुणी आणि विद्वान लोकांचा सन्मान
चाणक्य म्हणतात की, ज्या घरांमध्ये गुणी आणि आदरणीय व्यक्तींचा सन्मान केला जातो, तिथे माता लक्ष्मी स्वतः निवास करते. योग्य आणि विद्वान लोकांचा आदर करणाऱ्यांच्या घरी कधीही धन, सुख आणि समृद्धीची कमतरता भासत नाही. अशा पवित्र ठिकाणी मूर्ख लोकांना अजिबात थारा नसतो.
२. वादविवादापासून दूर राहणे
चाणक्य सांगतात की, ज्या घरांमध्ये परस्पर मतभेद, कौटुंबिक कलह किंवा भांडण-तंटे होत नाहीत, तिथेही माता लक्ष्मीचा वास असतो. अशा घरातील उत्पन्न आणि संपत्ती आपोआप सतत वाढत राहते. तसेच अशा घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही. त्याउलट सतत भांडणे होणाऱ्या कुटुंबात लक्ष्मी क्षणभरही थांबत नाही, ज्यामुळे तिथली सुख-समृद्धी हळूहळू नष्ट होते.
३. अन्नाचा सन्मान करणे
चाणक्य नीतीमध्ये हेदेखील सांगितले आहे की, ज्या घरात अन्नाचा सन्मान केला जातो, अन्नाचे मोल समजले जाते आणि ते वाया घालवले जात नाही, तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते. अशा घरांना कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही आणि कुटुंबात नेहमी आनंद राहतो. अशा लोकांना व्यवसाय आणि कामधंद्यात नेहमी खूप यश मिळते.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
