Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीती शतकानुशतके माणसाला योग्य मार्ग दाखवत आल्या आहेत. चाणक्यांनी केवळ राजकारण आणि समाजशास्त्राबाबतच सखोल विचार मांडले नाहीत, तर आनंदी आणि तणावमुक्त जीवन जगण्याचे अचूक मार्गही सांगितले आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात, जिथे मानसिक तणाव आणि अस्वस्थता सामान्य झाली आहे, तिथे चाणक्यांचे हे विचार एखाद्या संजीवनीसारखे आहेत. जर तुम्हीही आयुष्यात शांतता आणि समाधान शोधत असाल, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या चार सवयी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग नक्की बनवा.

भूतकाळाचा पश्चात्ताप करू नका

आचार्य चाणक्य म्हणतात की, जे घडून गेले ते बदलण्याची ताकद कोणाकडेही नसते. गेलेल्या गोष्टींचा सतत विचार करून वेळ वाया घालवणे आणि तणाव घेणे ही मूर्खपणाची गोष्ट आहे. शहाणा माणूस तोच असतो, जो भूतकाळातील चुकांमधून धडा घेतो आणि वर्तमान सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो.

लोभापासून दूर राहा

जीवनातील तणावाचे एक मोठे कारण म्हणजे असमाधान. जेव्हा माणसाच्या मनात सतत अधिक मिळवण्याची इच्छा असते, तेव्हा तो कधीही शांत राहू शकत नाही. चाणक्यांच्या मते, स्वतःच्या मेहनतीने जे मिळते त्यात समाधान मानणे, हाच खऱ्या आनंदाचा आणि मानसिक शांततेचा पाया आहे.

संगत निवडताना सावध रहा

तुम्ही कोणत्या लोकांसोबत वेळ घालवता, याचा थेट परिणाम तुमच्या स्वभावावर आणि मानसिक स्थितीवर होतो. नकारात्मक आणि वाईट विचारांच्या लोकांची संगत तुम्हाला अस्वस्थ करू शकते. त्यामुळे नेहमी अशा लोकांच्या सहवासात राहा जे तुम्हाला प्रेरणा देतात आणि सकारात्मक विचार ठेवतात.

स्पष्ट आणि सत्यवादी बना

खोटेपणा आणि फसवणुकीचा आधार घेणारी व्यक्ती नेहमी उघड होण्याच्या भीतीत जगत असते, त्यामुळे ती आतून कमकुवत होत जाते. चाणक्यांचे मत आहे की, जो माणूस सत्याचा मार्ग स्वीकारतो, त्याला कोणत्याही भीतीचा सामना करावा लागत नाही आणि तो मानसिकदृष्ट्या शांत राहतो. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ही तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)