3 Negative Traits That Can Destroy Your Life : पैसा, देखणं रूप किंवा महागड्या गाड्यांपेक्षा माणसाचा स्वभाव अधिक महत्त्वाचा असतो. आपला स्वभावच आपल्या वागण्याची ओळख आणि मर्यादा ठरवतो. त्यामुळे चुकीच्या स्वभावामुळे अनेकदा आपण नकळत स्वतःच अनेक अडचणी ओढवून घेत असतो. याबद्दल आचार्य चाणक्यांनी सुद्धा सांगितले आहे.

आचार्य चाणक्य विद्वान, रणनीतिकार आणि दूरदर्शी होते. त्यांनी ‘चाणक्य नीती ‘ नावाचा एक अत्यंत उपयुक्त ग्रंथ रचला. या ग्रंथात, त्यांनी धोरणांच्या स्वरूपात यश मिळवण्यासाठी सूचना व सूत्रे दिली आहेत. चाणक्य नीती ज्ञानापेक्षा व्यावहारिक शिकवणींवर अधिक लक्ष केंद्रित करते. चाणक्य नीतीनुसार, जर तीन गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या स्वभावात असल्या, तर नुकसान होणे निश्चित आहे.

आचार्य चाणक्य म्हणाले, अहंकार, क्रोध आणि लोभ माणसाच्या क्षमतांना पोखरून टाकतात. चाणक्यांचे हे विधान सत्य व व्यावहारिक आहे. जर या तीन गोष्टी एखाद्या व्यक्तीवर हावी झाल्या, तर त्या व्यक्तीचा नाश होण्यास फार वेळ लागत नाही. अशा व्यक्तीची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता नष्ट होते.

अहंकार, क्रोध आणि लोभ

चाणक्यांनुसार, जेव्हा अहंकार एखाद्या व्यक्तीच्या स्वभावात शिरतो. तेव्हा सर्वात आधी त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत बदल होतो. जेव्हा क्रोध येतो , तेव्हा माणसाची बुद्धी क्षीण होते आणि त्याच्या तोंडातून व कृतीतून नकारात्मक विचार बाहेर पडतात. याउलट, लोभ माणसाला सर्व मर्यादा ओलांडायला भाग पाडतो.

त्यामुळे अशा व्यक्तीवर कोणी प्रेम करत नाही. त्याला समाज व कुटुंबाचा पाठिंबाही मिळत नाही. अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात एकटीच राहते. म्हणून, माणसाने या तीन गोष्टी आपल्या स्वभावात कधीही आणू नयेत.

तसेच, आचार्य चाणक्यांच्या मते, फसवणूक किंवा वाईट मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही. अशा मार्गाने मिळवलेली संपत्ती व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण करते आणि कालांतराने तिचे आर्थिक जीवनही संकटात येऊ शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)