Chanakya Niti on Parenting : कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या भांड्यांना आकार देतो, त्याचप्रमाणे पालकही मुलांच्या भविष्याला लहानपणापासूनच योग्य आकार देण्याचे काम करत असतात. असं म्हणतात, मुलं ही कच्च्या मातीच्या भांड्यांसारखी असतात; त्यांना लहानपणी तुम्ही जसा आकार द्याल, तसंच त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि भविष्य घडत जातं. पण, आपण अनेकदा विसरतो की, मुले शिकवणीतून कमी आणि आपल्या वागणुकीतून जास्त शिकतात. घरात जे काही पाहतात, ऐकतात तेच क्षणांत शिकतात. घरातील वातावरण आणि वडीलधाऱ्यांचा एकमेकांबद्दलचा दृष्टिकोन त्यांच्या मनावर थेट परिणाम करून जातात.
तर आचार्य चाणक्य यांनीही आपल्या चाणक्य नीतीमध्ये मुलांच्या योग्य विकासावर आणि शिस्तीवर विशेष भर दिला होता. त्यांचा असा विश्वास होता की, केवळ लाड करणे पुरेसे नाही. तर योग्य व अयोग्य यात सीमारेषा आखणेही महत्त्वाचे आहे:
चाणक्य नीतीच्या अध्याय ३, श्लोक १०
लालनाद् बहवो दोषास्ताडनाद् बहवो गुणाः।
तस्मात्पुत्रं च शिष्यं च ताडयेन्न तु लालयेत्॥
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, अति लाडामुळे मुलांमध्ये दोष तर योग्य मार्गदर्शन आणि शिस्तीमुळे सद्गुण वाढतात. पण, याचा अर्थ आपण मारहाण करणे असा नाही. तर प्रेमाने योग्य मर्यादा घालून देणे असा होतो. त्यामुळे मुलांना उत्तम माणूस बनवण्यासाठी आपण त्यांच्यात बदलू शकणाऱ्या चार सवयी समजून घेऊया.
प्रेम
मुलाच्या प्रत्येक योग्य किंवा अयोग्य मागणीला बळी पडणे नव्हे. अमर्याद विशेषाधिकारामुळे मूल हट्टी बनते, ज्यामुळे ते वस्तू आणि नातेसंबंधांचे महत्त्व विसरते.
आदर
जेव्हा पालक मुलासमोर मोठ्याने बोलतात किंवा एकमेकांना कमी लेखतात, तेव्हा मुलाला कळते की, मतभेद मिटवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. नातेसंबंधांमध्ये आदर राखणे हा प्राथमिक धडा असायला हवा.
जबाबदारी
जर मुलाने चूक केली, तर प्रेमाच्या नावाखाली ती लपवणे योग्य नाही. रागावण्याऐवजी किंवा धमकावण्याऐवजी, काय चुकले आणि ते कसे सुधारायचे हे समजावून सांगा. यामुळे त्यांच्यामध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते.
सवयी
फोन टाळण्यासाठी कारणे सांगणे असो किंवा क्षुल्लक गोष्टींसाठी खोटे बोलणे असो, मुलांच्या नजरेतून या गोष्टी सुटत नाहीत. मोठी माणसे असे करताना मुलांना दिसली, तर त्यांच्या मनात खोटे बोलणे ही सामान्य गोष्ट असल्याची भावना निर्माण होऊ शकते.
आदर्श
पालकत्व म्हणजे नियम लादणे नव्हे, तर स्वतः एक आदर्श घालून देणे होय. जर आपण स्वतः प्रामाणिकपणा, संयम आणि आदर यांचा सराव केला, तर आपल्या मुलांना दुसरे काहीही शिकवण्याची गरज भासत नाही.
