Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. चांगले आणि वाईट यातील फरक कसा ओळखावा आणि कोणत्या ठिकाणी आपले नुकसान होऊ शकते, हे सर्व चाणक्य नीतीतून समजते. येथे आचार्यांनी दुर्जन लोकांविषयी सांगितले आहे. असे लोक कसेही असले तरी ते तुमच्यासाठी नुकसानकारकच ठरतात. तर सज्जन लोकांची साथ कधीही सोडू नये, कारण ते कधीही बदलत नाहीत.

खाली दिलेल्या श्लोकांमधून चाणक्यांनी सांगितले आहे की चांगले लोक कितीही संकट आले तरी साथ सोडत नाहीत. त्यामुळे आपणही चांगल्या माणसांची साथ कधीही सोडू नये. या गोष्टी समजावून सांगण्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत. तुम्हीही या श्लोकांचा अर्थ जाणून घेऊ शकता.

एतदर्थकुलीनानांनृपाःकुर्वतिसंग्रहम् ॥
आदिमध्यावसानेषुनत्य जन्तिचतेनृपम् ॥

चांगला माणूस कधीही बदलत नाही. कोणतीही परिस्थिती आली तरी तो आपला स्वभाव सोडत नाही. पण वाईट माणूस मात्र अडचण आली की साथ सोडून निघून जातो. म्हणूनच राजे चांगल्या आणि कुलीन लोकांना आपल्या जवळ ठेवतात. कारण असे लोक राजाच्या चांगल्या काळात, सामान्य काळात आणि संकटाच्या काळातही त्याची साथ सोडत नाहीत. ते नेहमी राजाच्या पाठीशी उभे राहतात.

प्रलयेभिन्नमर्यादाभवन्तिकिलसागराः ॥
सागराभेदमिच्छन्तिप्रलयेऽपिनसाधवः ॥

प्रलयाच्या काळात समुद्र स्वतःची मर्यादा ओलांडतो. सामान्यतः समुद्र शांत असतो, पण प्रलयाच्या वेळी त्याच्या प्रचंड लाटा उसळतात आणि त्यामुळे नुकसान होते. म्हणजेच समुद्र त्या वेळी आपली मर्यादा विसरतो. पण सज्जन लोक मात्र कितीही मोठे संकट आले तरी आपली मर्यादा आणि चांगुलपणा सोडत नाहीत.

दुर्जनस्वचसर्पस्यवरंस नदुर्जनः ॥
सर्योदशतिकालेतुदुर्जनस्तुपदेपदे ॥

या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी दुर्जन माणूस आणि साप यांच्यातील फरक सांगितला आहे. साप आणि दुर्जन यांच्यात कोण कमी नुकसानकारक आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. साप एखाद्या वेळी फक्त एकदाच दंश करतो. पण दुर्जन माणूस प्रत्येक पावलावर फसवतो आणि त्रास देतो. अनेकदा त्याचा खरा स्वभावही आपल्याला कळत नाही. म्हणून चाणक्य म्हणतात की दुर्जन माणसापेक्षा साप बरा. कारण साप वेळ आली तरच दंश करतो, पण दुर्जन माणूस प्रत्येक पावलावर नुकसान करत राहतो.

(टीप- या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)