Chanakya Niti: तुम्हाला असं वाटतं का की, जो माणूस तुमच्यासोबत हसतो, तो खरंच तुमच्या आनंदात आनंदी असतो का? गरजेचं नाही. अनेकदा सर्वात मोठा धोका एखाद्या शत्रूकडून नाही, तर आपण ज्याला आपला मित्र समजतो त्याच व्यक्तीकडून मिळतो. चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, जो व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमची कामं बिघडवतो आणि समोर मात्र गोड बोलतो, त्याच्यापासून सावध राहायला हवं. असे मित्र बाहेरून दुधासारखे स्वच्छ दिसतात, पण त्यांच्या मनात विष लपलेलं असू शकतं.
खोट्या मित्राची ओळख कशी करावी?
गरजेपेक्षा जास्त कौतुक करणे
चाणक्य नीतीनुसार, जो व्यक्ती प्रत्येक गोष्टीत तुमच्या हो ला हो म्हणतो आणि तुमची चूक कधीच सांगत नाही, त्याच्यापासून सावध राहा. खरा मित्र तुमचं कौतुक करण्यासोबतच तुमच्या चुका झाल्या तर तुम्हाला थांबवतो आणि समजावून सांगतो.
तुमच्या गैरहजेरीत तुमच्याबद्दल बोलणे
जो मित्र इतरांसमोर दुसऱ्यांच्या कमतरता आणि गुपितं सांगतो, तो तुमच्या गोष्टीही इतरांना सांगू शकतो.
तुमच्या यशाचा हेवा करणे
अडचणीच्या काळात साथ देणं सोपं असतं, पण तुमची प्रगती पाहून मनापासून आनंदी होणं ही खरी मैत्रीची ओळख आहे. तुमच्या यशानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झाला, तर या नात्याचा विचार करण्याची गरज आहे.
प्रत्येक वेळी तुम्हाला थांबवणे
जर एखादा मित्र तुमच्या प्रत्येक नवीन प्रयत्नाला, “तुझ्याकडून हे होणार नाही,” असं म्हणत थांबवत असेल, तर त्याच्या सल्ल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. सल्ला देणं आणि तुमचा आत्मविश्वास कमी करणं यात फरक आहे.
फक्त काम असेल तेव्हाच आठवण काढणे
चाणक्य नीतीनुसार, जो व्यक्ती तुम्हाला गरज असताना गायब होतो आणि स्वतःचं काम असेल तेव्हा पुन्हा तुमच्याकडे येतो, तो मित्र कमी आणि स्वार्थी जास्त असू शकतो.
तुमची गुपितं तुमच्याविरुद्ध वापरणे
तुमच्या कमतरता आणि वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासोबत शेअर करू नका. वेळेनुसार नाती बदलू शकतात आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टी तुमच्याविरुद्ध वापरल्या जाऊ शकतात.
वागण्यात बदल होणे
जोपर्यंत तुम्ही त्याच्यापेक्षा मागे आहात, तोपर्यंत तो तुमची साथ देतो. पण तुम्ही पुढे जाऊ लागलात की त्याचं वागणं बदलत असेल, तर अशा लोकांपासून सावध राहा.
चाणक्य नीतीची शिकवण
पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीवर संशय घ्यावा. चाणक्यांची शिकवण आहे की, विश्वास ठेवा, पण आधी व्यक्तीला नीट पारखून घ्या. खरा मित्र तो असतो जो तुमच्या यशाने आनंदी होतो, तुमची चूक झाल्यावर तुम्हाला समजावतो आणि कठीण काळात कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्यासोबत उभा राहतो. त्यामुळे लोक काय बोलतात यापेक्षा त्यांची कृती आणि वागणं पाहा. वेळ प्रत्येक व्यक्तीचा खरा चेहरा समोर आणतो. तुमच्या योजना विचार करून इतरांसोबत शेअर करा आणि तुमच्या कमतरता प्रत्येकासमोर सांगू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिका.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
