Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांना महान दूरदृष्टी असलेले विचारवंत, कुशल मुत्सद्दी आणि राजकारणी मानले जाते. त्यांनी आपल्या नीतिशास्त्र या ग्रंथामध्ये माणसाचे जीवन अधिक सोपे आणि योग्य पद्धतीने जगण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे मानले जातात आणि अनेक लोक त्यांचे पालन करतात. अशाच एका नीतीमध्ये त्यांनी खरा पुत्र, खरा पिता, खरा मित्र आणि चांगली पत्नी यांच्यात कोणते गुण असावेत, हे सांगितले आहे. चला तर, जाणून घेऊया आजची चाणक्य नीती.

श्लोक:

ते पुत्रा ये पितुर्भक्ताः स पिता यस्तु पोषकः।

तन्मित्रं यत्र विश्वासः सा भार्या यत्र निर्वृतिः।।

श्लोकाचा अर्थ:

आचार्य चाणक्य यांच्या मते, जो मुलगा आपल्या वडिलांचा आदर करतो आणि त्यांचे ऐकतो, त्यालाच खरा पुत्र म्हणता येते. तसेच जो वडील आपल्या मुलांचे योग्य प्रकारे पालनपोषण करतात, तेच खरे पिता असतात. ज्या मित्रावर मनापासून विश्वास ठेवता येतो, तोच खरा मित्र असतो. आणि ज्या पत्नीमुळे आयुष्यात सुख, समाधान आणि शांतता मिळते, तीच खरी पत्नी असते.

श्लोकाचे सार:

चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीची मुले त्याचा आदर करतात आणि त्याचे ऐकतात, त्याचे कुटुंब सुखी राहते. पण जर मुले वडिलांचे ऐकत नसतील, तर घरात वाद, भांडणे आणि दुःख निर्माण होते. चाणक्य असेही सांगतात की, मुलांचे चांगले पालनपोषण करणे ही वडिलांची जबाबदारी आहे. जर वडिलांनी स्वतःची जबाबदारी पार पाडली नाही, तर मुलांकडून आदर किंवा आज्ञापालनाची अपेक्षा ठेवू नये.

मित्राबद्दल बोलताना चाणक्य सांगतात की, ज्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवता येतो, तोच खरा मित्र असतो. तसेच ज्या पत्नीमुळे घरात कायम अशांतता, वाद आणि त्रास निर्माण होतो, अशा पत्नीमुळे संसारात सुख मिळू शकत नाही.

मित्रावर अती विश्वास ठेवू नये

श्लोक:

न विश्वसेदविश्वस्ते विश्वस्ते नाति विश्वसेत्।

विश्वासाद् भयमुत्पन्नं मूलान्यपि निकृन्तति॥

श्लोकाचा अर्थ:

आचार्य चाणक्य यांच्या मते, जो विश्वास ठेवण्यास योग्य नाही, त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नये. तसेच जो आपला जवळचा मित्र आहे, त्याच्यावरही अति विश्वास ठेवणे टाळावे. कारण कधीतरी तो रागाच्या भरात तुमची गुपिते किंवा खासगी गोष्टी इतरांसमोर सांगू शकतो. या श्लोकातून चाणक्य सांगतात की, आयुष्यात नेहमी सावध आणि शहाणपणाने वागणे गरजेचे आहे. कोणावरही अति विश्वास ठेवणे योग्य नाही.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)