True Friend vs Fake Friend Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना त्यांच्या काळातील अत्यंत ज्ञानी, हुशार पुरुष मानले जाते. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही आपल्याला आयुष्य योग्य मार्गाने जगण्याची दिशा दाखवतात. त्यांनी माणसांची विचारसरणी आणि वर्तणूक खूप जवळून समजून घेतली होती. म्हणूनच त्यांनी सांगितलेले विचार शेकडो वर्षे जुने असूनही आजही तंतोतंत खरे ठरतात.

चाणक्य यांच्या मते, जेव्हा आयुष्यात सर्व काही छान चाललेले असते आणि आनंद असतो, तेव्हा नवीन मित्र बनवणे खूप सोपे असते. मात्र, माणसाची खरी ओळख तेव्हा होते जेव्हा त्याच्यावर अचानक एखादे मोठे संकट येते किंवा पैशांची मोठी तंगी निर्माण होते. वाईट काळात सच्चे मित्र आणि स्वार्थी लोक यांच्यातील फरक कसा ओळखायचा, हे चाणक्य नीती आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवते. संकटकाळात आपले आणि परके यांतील फरक कसा ओळखावा आणि योग्य माणसाची पारख कशी करावी, हेच आपण समजून घेणार आहोत.

१) संकटाच्या वेळीच होते खरी परीक्षा

चाणक्य सांगतात त्याप्रमाणे, जेव्हा तुमच्याकडे सर्व काही सुरळीत असते, तेव्हा मित्र जोडणे खूप सोपे असते. परंतु, खरी परीक्षा तुम्ही स्वतः एखाद्या संकटात अडकता तेव्हा होते. जो माणूस तुमच्या वाईट काळात कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्यासोबत उभा राहतो, तोच तुमचा सर्वांत सच्चा मित्र असतो. याउलट, जे लोक तुमच्या चांगल्या दिवसांत तुमच्यासोबत राहतात, फिरतात; पण संकट येताच गायब होतात किंवा बहाणे बनवतात, असे लोक कधीही तुमचे ‘आपले’ असू शकत नाहीत.

२) रिकाम्या खिशामुळे दिसतो लोकांचा खरा चेहरा

चाणक्य नीतीनुसार, पैशांची कमतरता हा कोणत्याही माणसासाठी सर्वांत कठीण काळ असतो. चाणक्य म्हणतात की, जेव्हा तुमच्याकडील पैसे संपतात, तेव्हाच तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा खरा चेहरा समोर येतो. जे लोक तुमच्यासोबत केवळ तुमच्या पैशांमुळे किंवा फायदा घेण्यासाठी जोडलेले होते, ते पैशांची तंगी निर्माण होताच लगेच तुमच्यापासून अंतर ठेवू लागतात. मात्र, जो माणूस तुमच्याकडे एक रुपया नसतानाही तुमचा आदर करतो, तुम्हाला धीर देतो आणि आपल्या क्षमतेनुसार तुम्हाला मदत करतो, तोच माणूस आयुष्यात विश्वास ठेवण्यायोग्य असतो.

३) कठीण काळात आपल्यांची ओळख

कोणत्याही नात्याचे सत्य तेव्हाच समोर येते, जेव्हा घरावर एखादे मोठे संकट येते. सच्चा जोडीदार किंवा मित्र तोच असतो, जो कठीण परिस्थितीमध्येही तुमचा हात सोडत नाही आणि तुमच्यासोबत मिळून त्या समस्येचा सामना करतो. जर एखादी व्यक्ती तुमच्या सुखात आणि चांगल्या काळात पुढे पुढे करत असेल; पण दुःख येताच मागे हटत असेल, तर ती व्यक्ती केवळ नावापुरतीच तुमची आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे.

४) माणूस पारखण्याचा सर्वांत सोपा नियम

चाणक्य नीतीची सर्वांत मोठी शिकवण हीच आहे की, तुम्ही कधीही कोणावर आंधळा विश्वास ठेवू नये. कोणालाही आपला सच्चा मित्र किंवा जोडीदार मानण्यापूर्वी, ती व्यक्ती संकटाच्या वेळी तुमच्याशी कशी वागते हे नक्की पाहा. जे लोक फक्त तोंडावर गोड बोलतात; पण गरज पडल्यावर गायब होतात, त्यांच्यापासून लांब राहण्यातच शहाणपण आहे. मित्रांची संख्या कमी असली तरी चालेल; पण आयुष्यातील प्रत्येक वळणावर तुमच्या पाठीशी उभे राहणारे असावेत.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)