Smart Ways to Ignore People Without Being Selfish : चाणक्य म्हणतात, “हुशार व्हा, पण मूर्ख दिसा.” या एका वाक्यात जीवनातील एक महत्त्वाची शिकवण दडलेली आहे. आजच्या जगात प्रत्येकाला आपली हुशारी दाखवायची असते. मात्र प्रत्येक व्यक्तीचा हेतू चांगला असेलच असे नाही. जर तुम्ही प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवला किंवा सतत आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन केले, तर काही लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे चाणक्यांचा सल्ला असा आहे की, आपली बुद्धिमत्ता प्रत्येक वेळी दाखवण्याची गरज नाही. योग्य वेळ येईपर्यंत शांत राहून आपल्या हुशारीचा योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी वापर करणे सगळ्यात महत्वाचे आहे.

प्रत्येक वादविवादात स्वतःला सर्वात ज्ञानी सिद्ध केल्याने तुम्ही महान बनत नाही. उलट, लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागतात किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी, समोरच्या व्यक्तीची युक्ती समजल्यानंतरही, शांत राहणे हेच खरे शहाणपण असते. जेव्हा तुम्ही शांत राहता, तेव्हा लोकांचे खरे स्वरूप समोर येते. ही रणनीती तुम्हाला संघर्षाशिवाय पुढे जाण्यास मदत करते.

शहाणे व्हा, स्वार्थी नव्हे

चाणक्य तुम्हाला स्वार्थी राहायला सांगत नाहीत. उलट, ते म्हणतात की, जेव्हा परिस्थिती वाईट असते किंवा जेव्हा लोक तुमचा गैरफायदा घेऊ लागतात, तेव्हा आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे महत्त्वाचे आहे. स्वार्थी असणे म्हणजे इतरांना इजा पोहोचवणे नव्हे, तर स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि कल्याणासाठी योग्य निर्णय घेणे होय.

अशा प्रकारे करा लोकांकडे दुर्लक्ष

नियंत्रण

चाणक्य नीतीनुसार, आयुष्यात प्रत्येक गोष्ट इच्छेनुसार घडत नाही. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिले, तर तुम्ही अस्वस्थ व्हाल. म्हणून, अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे महत्त्वाचे आहे. हीच मानसिक शांती आणि यशाची गुरुकिल्ली आहे.

प्रतिसाद

प्रत्येकाला उत्तर देणे आवश्यक नाही. तुमचे काम, तुमचे यश, हेच तुमचे सर्वात मोठे उत्तर आहे.

स्पष्टीकरण

प्रत्येक निर्णयाचे कारण किंवा स्पष्टीकरण देत बसणे कधी-कधी तुमच्यासाठी कमजोरी ठरू शकते. चाणक्यांच्या मते, प्रत्येक गोष्टीचे उत्तर देण्यापेक्षा योग्य वेळी मौन बाळगणे अधिक शहाणपणाचे असते. म्हणूनच ते म्हणतात, “मौन हे अनेक समस्यांवरचे समाधान आहे.”

बिन्दास्त राहा

प्रत्येकाच्या बोलण्याकडे लक्ष देणे किंवा प्रत्येक गोष्टीचे उत्तर देणे आवश्यक नाही. तुमच्या विरोधात बोलणारे काही लोक तुमच्या चुका किंवा कमजोरी शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा योग्य वेळी मौन बाळगणे अधिक शहाणपणाचे ठरते. कधी-कधी तुमचे मौनच समोरच्याला योग्य उत्तर देऊ शकते.

नाही म्हणायला शिका

जे लोक प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात ते सर्वात जास्त दुःखी असतात. आपल्या मर्यादा निश्चित करा. हाच आत्मसन्मान आहे.

ध्येय

क्षुल्लक गोष्टींमुळे तुमचे लक्ष तुमच्या मोठ्या ध्येयापासून विचलित होऊ देऊ नका. जे आपल्या ध्येयापासून नजर हटवत नाहीत, तेच जिंकतात.

अति स्पष्टवक्तेपणा

या जगात अति स्पष्टवक्तेपणा कधी-कधी कमजोरी ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मनात येईल तशी बोलण्यापेक्षा प्रसंगानुसार काय बोलावे आणि काय टाळावे, याची समज असणे गरजेचे आहे. सावधगिरीसोबतच साधेपणा आणि संयम राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)