Chanakya Niti: मत्सर, द्वेष हेवा, आसूया….या मानवी भावना आहेत. या भावना तुमच्याबद्दल किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल बरंच काही सांगतात. एखाद्याचे आयुष्य पाहून इतरांना तुमचा किंवा तुम्हाला इतरांचा हेवा वाटू शकतो, तुमच्या आयुष्यातही त्या गोष्टी हव्यात अशी भावना निर्माण होऊ शकते. एखाद्याचे राहणीमान पाहून अनेकदा इतरांना तुमचा अथवा इतरांना तुमच्याबाबत आसूया वाटू शकते. पण जेव्हा ही भावना तुमच्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा मत्सर किंवा द्वेष निर्माण होतो. या देखील मानवी भावना आहेत आणि त्या जाणवणे सामान्य आहे पण त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते अन्यथा आपले आणि इतरांचे आयुष्य उद्धवस्त होऊ शकते.
अनेकदा आपल्या आसपास असे लोक असतात ज्यांना तुमच्याबाबत हेवा, आसूया किंवा मत्सर वाटतो पण अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा हे लोक तुमच्या खासगी आयुष्याबाबत माहिती शोधू लागतात. त्यांना जाणून घ्यायचे असते की, नक्की तुमच्या आयुष्यात काय सुरु आहे. तुम्ही कसे आहात? याचा अर्थ असा नाही की त्यांना तुमची काळजी वाटत असते. कित्येकदा या लोकांना फक्त हे माहित करून घ्यायचे असते तुमच्या आयुष्यात नक्की काय सुरु आहे. तुम्ही किती पैसे कमावता, घरात काय अडचणी आहेत, कुटुंबात वाद होतात का, मुलांची प्रगती कशी सुरु आहे? या गोष्टींची माहिती मिळताच हे लोक कसलाही विचार न करता तुमच्या नातेवाईंकामध्ये या गोष्टी पसरवतात. तिथून सर्व अडचणींची सुरुवात होते. तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी त्यांना सांगता तेव्हा त्याच गोष्टी ते तुमच्या विरोधात वापरतात. कधी तुमच्या पाठीमागे चर्चा करण्यासाठी तर कधी तुम्हाला सर्वांसमोर कमी लेखण्यासाठी या गोष्टींचा वापर करतात.
नातेवाईंकाना तुमच्याबाबत मत्सर किंवा द्वेष का वाटतो?
चाणक्य नीतिनुसार, संकटाच्या वेळी व्यक्तीला सावध राहायला हवे. कित्येकदा संकट बाहेरच्या लोकांमुळे नव्हे तर तुमच्या कुटुंबातील आणि नातेवाईंकामुळे येतात. काही नातेवाईक असे असतात जे तुमच्या चांगल्या गोष्टींपेक्षा तुमच्या उणिवांकडेच लक्ष देतात. तसेच काही लोक तुमच्या यश सोडून फक्त तुमच्या अपयशावर लक्ष ठेवून असतात. तुमच्या चांगली कमाई केली, नवीन गाडी घेतली किंवा मोठे घर घेतले अथवा आयुष्यात पुढे गेला तरी काही लोकांना तुमचा आनंद सहन होत नाही. ते तुमच्या यशामध्येही काही ना काही दोष शोधतात.
त्यामुळे, सर्वात आधी ही गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की, इतरांचा मत्सर ही तुमची चूक नाही. जर एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीमुळे नाखूष असेल किंवा तुमच्या प्रत्येक यशात दोष शोधत असेल, तर त्यांच्या या मानसिकतेसाठी तुम्ही स्वतःला दोष देण्याची गरज नाही. आज आपण ‘चाणक्य नीती’मधील अशा काही तत्त्वांचा आढावा घेणार आहोत, जी तुम्हाला मत्सर आणि नकारात्मक विचार बाळगणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचे रक्षण करण्यास मदत करू शकतात.
प्रतिक्रियेवर नियंत्रण
चाणक्याच्या तत्त्वज्ञानानुसार, जो माणूस आपल्या रागावर नियंत्रण ठेवतो, तोच खऱ्या अर्थाने बलवान असतो. उदाहरणार्थ, ‘विचार करा, कुटुंबात सगळेच आपले आहेत आणि पण कोणीतरी जेव्हा सांगतं की, नोकरी गेली? आता काय करणार?’ पुन्हा विचारा, ‘वय वाढतंय, लग्न का नाही करत आहात?’ अशा वेळी राग येणे स्वाभाविक आहे. तुम्हाला काहीतरी बोलावेसे आणि उत्तर द्यावेसे वाटेल. पण इथेच थांबा. जो माणूस तुमचा अपमान करू इच्छितो, त्याला तुमच्या भल्यापेक्षा तुमच्या प्रतिक्रियेत जास्त रस असतो. म्हणून शांत राहा, हसा आणि परिस्थिती बदला. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे नसते. अनेकदा तुमचे मौन हीच सर्वात प्रभावी प्रतिक्रिया असते.
तुमची माहिती खाजगी ठेवा
मत्सरी नातेवाईकांना अनेकदा तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. उदाहरण, ‘किती पैसे कमावते?’, ‘वय किती आहे?’, लग्न कधी करणार? नोकरीसाठी काय योजना आहे का? घरात सर्वकाही ठिक आहे?’
अशावेळी त्यांना उत्तर द्या की, “देवाच्या कृपेने सर्वकाही चांगले सुरु आहे.” अजून काही ठरले नाही पण वेळ आल्यावर कळेल. तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल सर्वांना सांगण्याची गरज नाही.”
विनाकारण वाद घालू नका
जर एखाद्या नातेवाईकाने “तुम्हाला हे काम जमणार नाही” असे म्हटले तर लगेच वाद घालण्याऐवजी ते म्हणा “तुमचे मत बरोबर आहे, बघू प्रयत्न करू. त्यामुळे वाद टाळता येतो.
याचा अर्थ असा आहे की तुमचा स्वतःवर विश्वास नाही. प्रत्येकाला उत्तर देण्यात तुमची उर्जा वाया घालवू नका. बऱ्याच वेळा शांत राहणे ही सर्वात समजूतदार गोष्ट आहे.
नम्रतेलाच शक्ती बनवा
चाणक्य नीतीनुसार, जर कोणी तुमचा अपमान करत असेल, तर लगेच रागावण्याऐवजी शांत राहा. कोणी म्हणाले, “तुम्ही तर अजूनही तुमच्या वडिलांच्या पैशांवर पैसे उधळत आहात.”
तुम्ही म्हणू शकता, “काका, जर तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी चांगलं करायला हवं, तर मला सल्ला द्या.” अशा प्रकारे तुम्ही भांडण न करता तुमचा स्वाभिमान राखता. पण लक्षात ठेवा, नम्रता म्हणजे अपमान करणे नव्हे. गरज असेल तेव्हा आपल्या मर्यादा स्पष्ट करणे देखील महत्त्वाचे आहे.
आवश्यकतेनुसार प्रतिसाद द्या
जर कोणी तुमच्या शांततेला कमतरता समजून वारंवार मर्यादा ओलांडत असेल, तर शांतपणे पण स्पष्टपणे प्रतिसाद द्या. जर कोणी तुमच्या खाजगी आयुष्याची वारंवार दखल घेत असेल, तर म्हणा, “माझं खाजगी आयुष्य माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्यामध्ये आहे. मला नाही वाटत की त्याबद्दल बोलणं योग्य आहे.” लक्षात ठेवा, तुमच्या समोरच्या व्यक्तीचा अपमान करणे आवश्यक नाही. बस त्याला आपली सीमा दाखवणे पुरेसे आहे.
