Chanakya Niti: घरात सुख-शांती असूनही अचानक वाद वाढले, पैसा टिकेनासा झाला किंवा कुटुंबात सतत तणावाचे वातावरण जाणवू लागले तर त्यामागे काही चुकीच्या सवयी कारणीभूत असू शकतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात कुटुंब, धन, नातेसंबंध आणि शिस्त याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पती-पत्नीच्या काही सवयी घरातील आनंद आणि आर्थिक स्थैर्यावर परिणाम करू शकतात, असे चाणक्य नीतीमध्ये सांगितले जाते.

चाणक्यांच्या विचारांनुसार, दांपत्य जीवनात एकमेकांसाठी आदर, विश्वास, संयम आणि शिस्त असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सुखी संसार टिकवायचा असेल तर पती-पत्नीने कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत सविस्तर जाणून घेऊया…

१. एकमेकांचा अपमान आणि कटू शब्दांचा वापर

नात्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे एकमेकांचा आदर. छोट्या-छोट्या कारणांवरून एकमेकांना टोमणे मारणे, अपमान करणे किंवा सतत कटू शब्दांचा वापर करणे यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. चाणक्य नीतीनुसार, ज्या घरात सतत वाद आणि अपमानास्पद भाषा वापरली जाते, तिथे मानसिक शांतता टिकणे कठीण होते. त्यामुळे मतभेद असले तरी संवाद करताना शब्दांवर संयम ठेवणे गरजेचे आहे.

२. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्याची सवय

पैसा कमावण्याइतकंच त्याचं योग्य नियोजन करणंही महत्त्वाचं आहे. गरज नसताना खर्च करणे, केवळ दिखाव्यासाठी पैसे उधळणे किंवा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे यामुळे आर्थिक अडचणी वाढू शकतात. पती-पत्नीपैकी एखाद्याला सतत वायफळ खर्चाची सवय असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावर होऊ शकतो. त्यामुळे बजेट तयार करणे आणि भविष्यासाठी बचत करणे महत्त्वाचे ठरते.

३. एकमेकांपासून महत्त्वाच्या गोष्टी लपवणे

विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया आहे. महत्त्वाच्या गोष्टी लपवणे, आर्थिक व्यवहारांबाबत खोटे बोलणे किंवा जोडीदारापासून सतत काहीतरी लपवून ठेवणे यामुळे नात्यात संशय निर्माण होऊ शकतो. एकदा विश्वासाला तडा गेला की छोट्या गोष्टीही मोठ्या वादाचे कारण बनू शकतात. त्यामुळे पती-पत्नीमध्ये आवश्यक त्या बाबतीत स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद असणे गरजेचे आहे.

४. आळस आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष

चाणक्य नीतीमध्ये शिस्त, स्वच्छता आणि वेळेचे महत्त्व अधोरेखित केले जाते. घरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे, प्रत्येक काम पुढे ढकलणे किंवा सतत आळशीपणा करणे यामुळे दैनंदिन जीवनात अव्यवस्था निर्माण होऊ शकते. स्वच्छ घर आणि शिस्तबद्ध जीवनशैली यामुळे वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते. त्यामुळे घराची स्वच्छता, स्वतःची स्वच्छता आणि दैनंदिन कामांमध्ये शिस्त ठेवण्याची सवय लावणे फायदेशीर ठरते.

५. घरातील भांडणं आणि खासगी गोष्टी बाहेर सांगणे

पती-पत्नीमधील प्रत्येक मतभेद इतरांसमोर मांडणे ही आणखी एक मोठी चूक ठरू शकते. घरातील वैयक्तिक समस्या, जोडीदाराच्या कमतरता किंवा कौटुंबिक गुपिते वारंवार बाहेर सांगितल्यास परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते. चाणक्य नीतीच्या विचारांनुसार, गोपनीयता अर्थात प्रायव्हसी आणि संयम राखणे महत्त्वाचे आहे. मात्र गंभीर कौटुंबिक समस्या किंवा सुरक्षिततेशी संबंधित परिस्थिती असल्यास विश्वासू व्यक्ती, काउन्सिलर किंवा तज्ज्ञांची मदत घेणे योग्य ठरते.

सुखी संसारासाठी काय कराल?

पती-पत्नीने एकमेकांचा आदर करणे, रागाच्या भरात निर्णय न घेणे, आर्थिक नियोजन करणे, महत्त्वाच्या गोष्टींबाबत पारदर्शक राहणे आणि घरातील खासगी बाबींची अनावश्यक चर्चा टाळणे या सवयी नात्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.