Chanakya Niti For Friendship : आयुष्यात जर एखादा खरा मित्र मिळाला, तर तुम्ही अनेक संकटांवर सहज मात करू शकता. एक चांगला मित्र तुम्हाला वाईट परिस्थितीतून बाहेर काढतो आणि सुख-दुखात खंबीरपणे पाठीशी उभा राहतो. आचार्य चाणक्यांच्या मते, खऱ्या मित्राचे काही खास गुण असतात. जर हे गुण तुमच्या मित्रात असतील, तर चुकूनही त्याची साथ सोडू नका. जाणून घेऊया खऱ्या मित्राच्या या ५ गुणांबद्दल

१. वाईट मार्गापासून रोखणारा

जो व्यक्ती तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखतो आणि कोणत्याही चुकीच्या कामात तुमची साथ देत नाही, तोच तुमचा खरा मित्र आहे, हे समजून घ्या. याउलट, जे लोक तुम्हाला वाईट कृत्ये करण्यासाठी प्रवृत्त करतात, अशा लोकांपासून नेहमी लांब राहिलेलेच बरे.

२. स्वतःचे खरे चारित्र्य दाखवणारा

जो मित्र तुमच्यासमोर कधीही खोटेपणा किंवा दिखावा करत नाही आणि स्वतःचे खरे रूप तुमच्यासमोर मांडतो, त्याचा तुमच्यावर पूर्ण विश्वास असतो. अशा व्यक्तीवर तुम्हीही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता आणि त्याला आपला खरा मित्र मानू शकता.

३. तुमच्या स्वाभिमानाचा रक्षक

जो मित्र तुमचा आदर करतो आणि समाजातही तुमच्या चांगल्या गुणांचे कौतुक करतो, तोच तुमचा खरा मित्र असतो. याउलट, जे लोक पाठीमागे तुमची निंदा करतात आणि समोर मात्र गोड बोलतात, अशा दुटप्पी वृत्तीच्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला चाणक्य देतात.

४. मत्सर न करणारा

तुम्ही आयुष्यात कोणत्याही पदावर किंवा परिस्थितीत असा, जो व्यक्ती कधीही तुमचा हेवा वा मत्सर करत नाही, तोच तुमचा खरा हितचिंतक आणि मित्र असतो. अशा मित्राची साथ तुम्हीही आयुष्यभर दिली पाहिजे. चाणक्य म्हणतात की, ज्या व्यक्तीला असा मित्र मिळतो, त्याचे जीवन सुजलाम सुफलाम होते.

५. सुख-दुःखाचा सोबती

जे लोक केवळ तुमच्या सुखाच्या काळात सोबत असतात आणि संकट येताच पळून जातात, त्यांना कधीही मित्र मानू नका. खरा मित्र तोच असतो, जो सुखात जेवढा आनंद साजरा करतो, तेवढाच दुःखातही खांद्याला खांदा लावून उभा राहतो. नीती शास्त्रानुसार, सुख आणि दुःखात समान भाव ठेवून साथ देणाराच खरा मित्र असतो.

जर तुमच्या मित्रमंडळींमध्ये असा एखादा मित्र असेल ज्याच्यात हे गुण आढळतात, तर समजून जा की तुम्हाला तुमचा खरा मित्र मिळाला आहे आणि त्याची साथ कधीही सोडू नका.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)