Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात अशा ३ प्रकारच्या लोकांबद्दल सांगितले आहे, ज्यांना कधीही फुकट सल्ला (Free Advice) देऊ नये. अशा लोकांना समजावून सांगायला गेलात, तर तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि मनाची शांतता तिन्ही गोष्टी वाया जातात. चला तर मग जाणून घेऊया हे ३ लोक कोण आहेत:

१. मूर्ख व्यक्ती

जो माणूस स्वभावानेच मूर्ख असतो आणि ज्याला स्वतःमध्ये बदल करायचा नसतो, त्याला कधीही ज्ञान देऊ नका. अशा माणसाला तुम्ही कितीही चांगली गोष्ट सांगितली, तरी तो त्याचा चुकीचाच अर्थ काढेल. अशा लोकांमध्ये खूप अहंकार असतो, त्यांना वाटते की आपल्याला सगळंच समजतं. तुम्ही त्यांना मदत करायला गेलात, तर ते तुम्हालाच आपला शत्रू मानू लागतील. मूर्ख माणसाला समजावणे म्हणजे ‘म्हशीसमोर गीता वाचण्यासारखे’ आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या हालतीवर सोडणेच शहाणपणाचे ठरते.

२. दुष्ट आणि वाईट विचारांचे लोक

समाजात काही लोक नेहमी इतरांचे वाईट करण्याचा किंवा फसवण्याचा विचार करत असतात. अशा दुष्ट किंवा कपटी लोकांना कधीही चांगला सल्ला देऊ नका. कारण, ते तुमच्या चांगल्या विचारांचा वापर उलट लोका फसवण्यासाठी किंवा काहीतरी चुकीचे काम करण्यासाठी करू शकतात. तसेच, तुम्ही त्यांना सुधारायला गेलात, तर ते तुमचे ऐकण्याऐवजी तुमच्याविरुद्धच कट कारस्थानं रचू शकतात. वाईट माणसाची संगत तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते, म्हणून यांच्यापासून लांबच राहा.

३. नेहमी रडगाणे गाणारे आणि नकारात्मक लोक

काही लोकांना सगळं काही मिळूनही नेहमी नशिबाचा किंवा परिस्थितीचा रडगाणा गाण्याची सवय असते. ते नेहमी नकारात्मक गोष्टींचाच विचार करतात. अशा लोकांना तुम्ही कितीही चांगला मार्ग दाखवला, तरी त्यांना त्यात काहीतरी अडचण किंवा चूक दिसेलच. जे लोक स्वतःहून आनंदी राहू शकत नाहीत, त्यांना तुमचा सल्ला कधीच आवडणार नाही. उलट, अशा लोकांबरोबर राहिल्याने त्यांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करते आणि तुम्ही स्वतः मानसिकदृष्ट्या त्रस्त होता.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)