Chanakya Niti Lessons That Can Change Your Perspective : आचार्य चाणक्य यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावांनीही ओळखले जाते. त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला एका सामान्य व्यक्तीपासून सम्राट बनण्यास मदत केली. आपल्या अनुभवातून आणि ज्ञानातून अनेक महत्त्वाचे विचार मांडले जे ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात लिहिले आहेत. या चाणक्य नीतीमध्ये राज्यकारभार, पैसा, युद्धनीती, माणसांचे स्वभाव आणि जीवन जगण्यासंबंधी अनेक तत्त्वे सांगितली आहेत. जीवनातील प्रत्येक परिस्थितीला कसे सामोरे जावे याचे ज्ञान मिळवण्यासाठी अनेकांनी ही चाणक्य नीती वाचली सुद्धा आहे.
चाणक्यांनी जीवनातील सत्य आणि वास्तव गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. त्यामुळे जीवनातील कठीण परिस्थिती आणि वास्तव समजून घेण्यास मदत होते. त्यांनी मैत्री, शत्रुत्व, शिक्षण आणि जीवनातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर विचार मांडले आहेत. त्यांचे हे विचार आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. त्यांनी असे नऊ सल्ले सांगितले आहेत जे प्रत्येकाने वाचून, समजून घेतली पाहिजेत. जर तुम्ही तरुण असाल आणि लवकरच तुमची तिशी गाठणार असाल असाल, तर आचार्य चाणक्यांचे विचार तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलतील.
१. कधीही अति प्रामाणिक राहू नका. कारण – अनेकदा सरळमार्गी लोकांचाच सर्वात आधी उपयोग करून घेतला जातो आणि प्रामाणिक लोकांनाच सर्वात आधी दुःख भोगावे लागते.
२. भूतकाळात रमून राहू नये किंवा भविष्याबद्दल जास्त चिंता करू नये. कारण – हुशार मंडळी वर्तमानात जगण्यावर विश्वास ठेवतात.
३. जेव्हा कधी तुम्हाला भीती वाटू लागेल. तेव्हा त्या मनात बसलेल्या भीतीला आधी नष्ट करा.
४. तुमच्या योजना इतरांना सांगणे टाळा. एखाद्या हिसार व्यक्तीचा सल्ला घ्या, तो गुप्त ठेवा आणि ती योजना पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करा.
५. तुमचे विचार आणि स्वभाव जुळणाऱ्या लोकांशीच मैत्री करा. विचार आणि स्वभावात खूप फरक असलेल्या व्यक्तींशी मैत्री केल्यास नात्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
६. मनुष्य एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरतो, आपल्या कर्मांचे चांगले आणि वाईट परिणाम आपल्याला एकट्यालाच भोगावे लागतात.
७. फुलांचा सुगंध वाऱ्यासोबत एका दिशेने पसरतो, पण माणसाचा चांगुलपणा सर्वत्र पोहोचतो. त्यामुळे नेहमी इतरांशी चांगले वागा.
८. जीवनात प्रत्येक गोष्ट सर्वांबरोबर शेअर करू नका. महत्त्वाची गुपिते कोणाला सांगताना विचार करा, कारण त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
९. आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी, तुम्ही स्वतःला तीन प्रश्न विचारावेत.
पहिला : मी हे का करत आहे?
दुसरा : याचे संभाव्य परिणाम काय असतील?
तिसरा : मी या कामात यशस्वी होईन का?
या प्रश्नांवर सखोल विचार करून समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतरच तुम्ही पुढे जावे असा सल्ला आचार्य चाणक्यांनी दिला आहे.
