Chanakya Niti: जीवनात यश कसं मिळवावं, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. काही लोक स्वतःच्या अनुभवातून तर काहीजण पौराणिक ग्रंथांचा अभ्यास करून याबद्दल माहिती मिळवतात. आपल्या ग्रंथांमध्ये मानवी कल्याणाशी संबंधित जवळपास प्रत्येक गोष्टीची माहिती दिली आहे.

असाच एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे महान राजकारणी आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु आचार्य चाणक्य यांनी लिहिलेलं चाणक्य नीतिशास्त्र. या ग्रंथामध्ये आजच्या काळातील अनेक समस्यांची उत्तरं मिळू शकतात. चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापैकी यश मिळवण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या नीती जाणून घेऊया…

कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी योग्य वेळ ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आचार्य चाणक्यांच्या मते, शहाणा माणूस वेळ आणि परिस्थितीचा विचार करूनच कोणत्याही कामाची सुरुवात करतो. कारण चुकीच्या वेळी सुरू केलेलं काम अपयश आणि निराशा देऊ शकतं. जर वेळ अनुकूल नसेल, तर संयम ठेवणं गरजेचं आहे.

कोणतंही काम सुरू करताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली, मी हे काम का करत आहे? दुसरी, या कामाचा परिणाम काय होईल? आणि तिसरी, या कामात मला यश मिळेल का?

गेलेल्या वेळेचा विचार करून पश्चात्ताप करण्यात काहीही अर्थ नाही. जर तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल, तर त्यातून शिकून आजचा दिवस अधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं भविष्य उज्ज्वल होईल.

जे धन खूप कष्टानंतर मिळतं, ज्यासाठी स्वतःचा धर्म सोडावा लागतो, शत्रूंची खुशामत करावी लागते किंवा त्यांच्या अधीन राहावं लागतं, अशा धनाचा कधीही मोह करू नये.

जसं हजारो जनावरांमध्येही वासरू आपल्या आईलाच शोधतं, त्याचप्रमाणे माणसाने केलेल्या कर्माचं फळही त्याला एक ना एक दिवस नक्की मिळतं.

शहाणा माणूस तोच असतो, जो कमाई आणि खर्च यांचा योग्य ताळमेळ ठेवतो. जे लोक उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात, ते नेहमी अडचणीत सापडतात. त्यामुळे आर्थिक सुख मिळवायचं असेल, तर कधीही उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)