Chanakya Niti On Marriage : आजकाल विवाहबाह्य संबंध, पती-पत्नीमधील भांडणं, वाद-विवाद, राग आणि यातून अगदी जोडीदाराची हत्या करण्यापर्यंतच्या धक्कादायक बातम्या ऐकायला मिळतात. अशा नकारात्मक वातावरणात अनेक तरुण-तरुणी लग्न करायला घाबरू लागले आहेत. आचार्य चाणक्य यांनी लग्नाबाबत अनेक मोलाचे सल्ले दिले आहेत. आजच्या काळात जीवनसाथी निवडताना अजिबात घाईगडबड करू नये. आपला लाइफ पार्टनर खूप विचारपूर्वक निवडला पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी कोणत्या ५ प्रकारच्या लोकांशी लग्न करणं टाळलं पाहिजे याविषयी सांगितलं आहे.

१. अत्यंत रागीट आणि कडू बोलणारे

अतिशय रागीट स्वभाव असलेल्या व्यक्तीशी कधीही लग्न करू नये. अशा स्वभावामुळे लग्नानंतर सतत भांडणे होतात आणि नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचते. नेहमी रागवणारे आणि इतरांना बोचणारे किंवा कडू बोलणारे लोक नाते जास्त काळ टिकवू शकत नाहीत. अशा नात्यात मानसिक तणाव वाढतो. त्यामुळे असा जोडीदार निवडणे टाळावे.

२. इतरांचा अपमान करणारे

जी व्यक्ती इतरांचा आदर करत नाही, अशा व्यक्तीशी कधीही नाते जोडू नये. अशा व्यक्तीशी लग्न केल्यास तुमचे आयुष्य तणावपूर्ण बनू शकते. जर एखादी व्यक्ती स्वतःच्या आई-वडिलांचा आणि समाजातील इतर लोकांचा मान राखत नसेल, तर ती भविष्यात तुमचाही सन्मान करणार नाही. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे.

३. केवळ बाह्य सौंदर्याच्या मोहात पडू नका

लग्नाचा निर्णय घेताना अनेकदा लोक केवळ बाह्य सौंदर्याला भुलतात. परंतु, केवळ शारीरिक सुखासाठी किंवा सौंदर्यासाठी लग्न करणे भविष्यात महागात पडू शकते. विवाहासाठी बाह्य रूप हे सर्वस्व नसते. लग्नाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी समोरील व्यक्तीचे मन, तिचा स्वभाव आणि चारित्र्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

४. सत्कर्मापासून दूर राहणारे

जे लोक धर्माचे पालन करत नाहीत, पूजा-अर्चा किंवा चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवत नाहीत, अशा लोकांशी नाते जोडणे टाळावे. इतरांना फसवणारे, कपटी आणि कोणालाही मदत न करणारे लोक मनाचे चांगले नसतात. अशा लोकांशी लग्न करणे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय ठरू शकतो.

५. सतत खोटे बोलणारे

जर एखादी व्यक्ती सतत खोटे बोलत असेल, तर अशा व्यक्तीबरोबर कधीही नाते तयार करू नका. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल, पण ती व्यक्ती वारंवार खोटे बोलते हे तुम्हाला ठाऊक असेल, तर तिच्याशी लग्न करू नका. खोटे बोलणारी व्यक्ती तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. हे लोक सुरुवातीला खोटे वायदे करून नाते जोडतात, परंतु नंतर जेव्हा त्यांचे सत्य समोर येते तेव्हा पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही.