Chanakya Niti for Married Life : लग्न हे अतिशय पवित्र नातं मानल जाते. पण या नात्यात विश्वास, आदर, संवाद असं फार गरजेचे आहे. पती-पत्नीमध्ये कोणत्याही गोष्टी सिक्रेट नसाव्या असे म्हटले जाते पण काही वेळा काही गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवणे अधिक श्रेयस्कर असते, याच विषयावर आचार्य चाणक्यांनी काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. वैवाहिक जीवनाबाबत चाणक्य नीतीत असे अनेक विचार आढळतात, जे नात्यांमधील संतुलन, व्यवहार आणि विवेकाचा मार्ग दाखवतात. मात्र, या विचारांना काळ आणि वेळेच्या परिस्थितीनुसार समजून घेणे गरजेचे आहे.
आजच्या युगात पारदर्शकता आणि संवाद हा मजबूत नात्याचा पाया मानला जातो. पण चाणक्य नीती अशा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्या प्रत्येक परिस्थितीत शेअर करणे योग्य मानले जात नाही. चला तर मग जाणून घेऊया या कोणत्या गोष्टी आहेत.
चाणक्य नीतीत संयम बाळगण्याचा सल्ला का दिला आहे?
आचार्य चाणक्य यांचे मत होते की, व्यक्तीने आपल्या वैयक्तिक आयुष्यात विवेक आणि संतुलन राखले पाहिजे. त्यांच्या नीतींचा उद्देश नात्यात अंतर निर्माण करणे हा नसून, परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्याची शिकवण देणे हा होता. याच कारणामुळे अनेक ठिकाणी ते विचारपूर्वक बोलण्याचा आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकाशी शेअर न करण्याचा सल्ला देतात.
१. आपल्या कमकुवतपणाचा सतत उल्लेख करणे टाळा
चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने आपली सर्वात मोठी कमजोरी किंवा भीती सर्वांसमोर उघड करू नये. याचा अर्थ असा नाही की, जीवनसाथीवरील विश्वास संपवला पाहिजे, तर भावनिक भरात घेतलेले निर्णय नेहमीच योग्य ठरतात असे नाही, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अनेकदा नात्यात वाद किंवा मतभेद होतात तेव्हा विश्वासाने सांगितलेल्या याच गोष्टी वादाचे कारण बनू शकतात. त्यामुळे आपल्या वैयक्तिक कमकुवतपणा कधी आणि कसा शेअर करायचा, यावर विचारपूर्वक निर्णय घेणे उत्तम मानले जाते.
२. आर्थिक परिस्थितीची पूर्ण माहिती शेअर न करणे
चाणक्य नीतीत संपत्ती व्यवस्थापनाला नेहमीच महत्त्व दिले गेले आहे. त्यानुसार, व्यक्तीने आपल्या बचतीबद्दल आणि भविष्यासाठी राखून ठेवलेल्या आर्थिक साधनांबाबत सतर्क राहिले पाहिजे. घराचे बजेट, आवश्यक खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या एकत्र पार पाडणे चांगली गोष्ट आहे, परंतु सर्व आर्थिक माहिती कोणत्या मर्यादेपर्यंत शेअर करायची, हे परिस्थितीवर अवलंबून असते. उधळपट्टी टाळणे आणि भविष्याची तयारी ठेवणे हा या नीतीचा मुख्य उद्देश आहे.
३. अपयशाला सामोरे जाण्याची पद्धत
आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी अपयशी ठरते. नोकरी, व्यवसाय किंवा सामाजिक जीवनात आव्हाने येणे स्वाभाविक आहे. चाणक्य नीती सांगते की, व्यक्तीने आपल्या प्रत्येक अपयाशाचे ओझे इतरांवर टाकू नये. आधी स्वतः परिस्थिती समजून घेणे, त्यावर उपाय शोधणे आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होणे आवश्यक आहे. मात्र, आधुनिक मानसशास्त्रानुसार, गरज पडल्यास जीवनसाथीशी मोकळेपणाने बोलल्यास मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे इथे संतुलन राखणे सर्वात महत्त्वाचे ठरते.
४. दान-पुण्याचा दिखावा न करणे
भारतीय परंपरेत दान हे नेहमी निष्काम आणि निःस्वार्थ भावनेने करण्यास सांगितले आहे. चाणक्य नीतीसुद्धा हाच संदेश देते की, जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली असेल, तर त्याचा प्रचार करण्याची गरज नाही. नीतीनुसार दानाचा उद्देश समाजाला मदत करणे हा असावा, प्रशंसा मिळवणे हा नाही. म्हणूनच दान-धर्म वैयक्तिक आणि नम्र भावनेने करण्याचा सल्ला दिला जातो.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
