Chanakya Niti Money, Family and Self Protection: आयुष्यात संकट कधी आणि कोणत्या रूपात येईल, हे सांगता येत नाही. अचानक आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते, जवळच्या व्यक्तीसमोर संकट उभं राहू शकतं किंवा परिस्थिती इतकी बिघडू शकते की नेमका निर्णय काय घ्यायचा, हेच समजेनासं होतं. अशा वेळी पैसा, कुटुंब आणि स्वतःचं रक्षण यापैकी कशाला सर्वाधिक प्राधान्य द्यायचं? आचार्य चाणक्यांच्या नीतीमध्ये याबाबत महत्त्वाची शिकवण सांगितली गेली आहे.
आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील महान शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व कुशल रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विचारांमध्ये केवळ राजकारण किंवा अर्थकारण नाही, तर दैनंदिन जीवनातील व्यवहारज्ञानाचाही समावेश आहे. त्यामुळेच आजही ‘चाणक्य नीती’तील अनेक विचारांची चर्चा केली जाते.
संकटाच्या वेळी पैशाचं महत्त्व काय?
चाणक्य नीतीमध्ये संकटाचा सामना करण्यासाठी धन जपून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नियमित उत्पन्न असताना मिळालेला पैसा केवळ खर्च करण्याऐवजी भविष्यातील अडचणींसाठी काही धन राखून ठेवावं, असा या विचाराचा अर्थ घेतला जातो.
कारण- परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही. आज आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी उद्या अचानक मोठा खर्च उद्भवू शकतो. आजारपण, व्यवसायातील नुकसान, नोकरीतील अडचण किंवा इतर कोणतीही अनपेक्षित परिस्थिती आली, तर साठवलेला पैसा उपयोगी पडू शकतो.
मग पत्नी किंवा कुटुंबाचं काय?
याच संदर्भात चाणक्य नीतीमध्ये एक महत्त्वाचा विचार मांडला गेला आहे. संकटाच्या काळात केवळ पैसा साठवून ठेवण्याला महत्त्व नाही, तर जवळच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
चाणक्य नीतीतील प्रसिद्ध श्लोक असा आहे-
आपदर्थे धनं रक्षेद् दारान् रक्षेद् धनैरपि।
आत्मानं सततं रक्षेद् दारैरपि धनैरपि॥
याचा साधा अर्थ असा की, संकटाच्या काळासाठी धनाचं रक्षण करावं. मात्र, गरज पडल्यास धन खर्च करून पत्नी आणि कुटुंबाचं रक्षण करावं. पण या सगळ्यापेक्षा स्वतःचं रक्षण करणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे.
म्हणजे नेमकं प्राधान्य कोणाला?
चाणक्यांच्या या शिकवणीत एक महत्त्वाचा जीवनधडा दडलेला आहे. पैसा महत्त्वाचा आहे. कारण- तो संकटाच्या वेळी आधार देऊ शकतो. मात्र, पैशापेक्षा माणसाचं जीवन आणि सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे.
म्हणूनच संकटाच्या वेळी पैसा वाचवण्यासाठी स्वतःचा किंवा कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये. परिस्थितीनुसार पैसा खर्च करावा लागला तरी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं, असा या विचाराचा व्यापक अर्थ आहे.
‘वाईट संगती’बाबतही चाणक्यांचा इशारा
चाणक्यांनी केवळ पैसा आणि कुटुंबाबाबतच नव्हे, तर माणसानं कोणाच्या सहवासात राहावं याबाबतही सावध केलं आहे. मूर्ख व्यक्तीला शिकवण्यात वेळ घालवणं, दुष्ट स्वभावाच्या व्यक्तीची जबाबदारी घेणं किंवा सतत दुःखी आणि नकारात्मक व्यक्तींच्या सहवासात राहणं यांमुळे ज्ञानी व्यक्तीलाही त्रास होऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं आहे.
म्हणूनच जीवनात पैसा कमावण्याइतकंच योग्य व्यक्तींची निवड करणं, संकटासाठी तयारी ठेवणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.
चाणक्य नीतीचा हा विचार आजच्या काळातही एक गोष्ट स्पष्ट करतो-पैसा आवश्यक आहे, तसेच कुटुंबही महत्त्वाचं आहे. पण, कोणत्याही संकटात स्वतःचं जीवन आणि सुरक्षितता सर्वांत आधी जपली पाहिजे.
(Disclaimer: या लेखातील माहिती चाणक्य नीतीतील पारंपरिक विचारांच्या आधारे देण्यात आली आहे. याचा उद्देश केवळ माहिती देणे हा आहे.)
