One Mistake Can Destroy Trust : आचार्य चाणक्यांची तत्त्वे आणि विचार थोडे कठोर वाटू शकतात. पण, हीच कठोरता जीवनाचे सत्य आहे. आपल्या धावपळीच्या जीवनात आपण या विचारांकडे दुर्लक्ष करू शकतो. पण, हे शब्द तुम्हाला जीवनातील प्रत्येक परीक्षेत मदत करतील. आज आपण आचार्य चाणक्यांच्या आणखी एका विचाराबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत जो सत्यावर आधारित आहे.

“पृथ्वी सत्य पे टिकी हुई है। ये सत्य की ही ताकत है, जिससे सूर्य चमकता है और हवा बहती है। वास्तव में सभी चीज़ें सत्य पे टिकी हुई हैं।” आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्यांच्या या विधानाचा अर्थ असा आहे की, संपूर्ण जग सत्याच्या आधारावर आहे. पृथ्वी देखील सत्याच्या आधारावर टिकून आहे. सूर्य रोज प्रकाश देतो, रोज वारा वाहतो, यामागेही निसर्गाचा एक सत्य नियम आहे. जगातील प्रत्येक गोष्ट काही ना काही नियम आणि सत्यावर आधारित आहे. तसाच मानवी जीवनाचा पायाही सत्यच असला पाहिजे. कारण – खोटेपणा, फसवणूक, द्वेष आणि हिंसाचार जीवनात केवळ समस्याच आणतात.

कधीकधी एखादी व्यक्ती सत्य लपवण्यासाठी वारंवार खोटे बोलते. त्यावेळी आपल्याला वाटू शकते की, ‘हे तर फक्त एक खोटे आहे, यामुळे काय मोठे नुकसान होणार?’ पण, एक खोटेसुद्धा अनेकदा महागात पडू शकते. एखाद्याच्या भल्यासाठी किंवा एखादी परिस्थिती सांभाळण्यासाठी एक-दोन वेळा खोटं बोललं गेलं तर, कदाचित त्याला माफही केलं जाऊ शकते. मात्र, जर खोटेपणाची सवयच लागली आणि त्यावरच संपूर्ण आयुष्य उभे राहिले. तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. अशा खोटेपणामुळे नात्यांमध्ये अविश्वास निर्माण होतो आणि शेवटी व्यक्तीचे आयुष्य दुःख, तणाव आणि त्रासाने भरून जाऊ शकते.

काही लोक आपल्या चुका लपवण्यासाठी किंवा इतरांची फसवणूक करण्यासाठी वारंवार खोटे बोलतात. मात्र, कितीही खोटे बोलले तरी एक ना एक दिवस सत्य समोर येतेच. जेव्हा अशा व्यक्तींचे खरे रूप लोकांसमोर येते, तेव्हा समाजातील त्यांचा आदर आणि विश्वास कमी होतो. लोक अशा व्यक्तींवर विश्वास ठेवणेही टाळतात. म्हणूनच आचार्य चाणक्य सत्य आणि प्रामाणिकपणाला महत्त्व देतात. ज्याप्रमाणे सूर्य सतत प्रकाश देतो आणि हवा प्रत्येक सजीवाला श्वास घेण्यासाठी मदत करते, त्याचप्रमाणे माणसानेही आपल्या जीवनात सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगल्या आचरणाचा आधार घेतला पाहिजे. कारण सत्याच्या आधारावर अनुभवलेलं जीवनच खऱ्या अर्थाने सन्मान आणि विश्वास मिळवून देते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)