Negative People at Home: आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात, जी सुरुवातीला खूप गोड बोलतात, आपुलकी दाखवतात, सतत जवळ राहण्याचा प्रयत्न करतात; पण हळूहळू त्यांच्यामुळे घरातील शांतता, आनंद आणि नात्यांमधील विश्वास कमी होऊ लागतो. अनेकदा लोकांना हे बदल लगेच जाणवत नाहीत. मात्र, वेळ गेल्यानंतर लक्षात येतं की, काही व्यक्ती नकळत आयुष्यात नकारात्मकता वाढवत होत्या.

प्राचीन भारतीय विचारवंत चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रामध्ये अशाच काही लोकांविषयी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. चाणक्यांच्या मते, काही व्यक्तींची संगत घरातील सुख-शांतीसाठी घातक ठरू शकते. ही केवळ पारंपरिक आणि तात्त्विक मांडणी असून, त्याकडे श्रद्धा आणि वैयक्तिक अनुभवांच्या दृष्टीनं पाहिलं जातं.

स्वार्थी लोकांपासून अंतर ठेवणं का महत्त्वाचं?

काही लोक नात्यांपेक्षा स्वतःच्या फायद्यालाच अधिक महत्त्व देतात. अशा व्यक्ती तुमच्या आनंदात सहभागी असल्याचा आव आणतात; पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे स्वतःचा स्वार्थ दडलेला असू शकतो. गरज संपली की, हे लोक अचानक दूर जातात. चाणक्यांच्या विचारांनुसार, अशा लोकांना घरात वारंवार स्थान दिल्यास घरातील विश्वासाचं वातावरण कमकुवत होऊ शकतं.

समोर गोड, मागे वेगळंच बोलणारे लोक

काही व्यक्ती तुमच्यासमोर अत्यंत प्रेमानंवागतात; पण दुसऱ्यांसमोर तुमच्याबद्दल वेगळीच चर्चा करतात. अशा दुटप्पी स्वभावाच्या लोकांमुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वाढते. छोट्या छोट्या गोष्टींवरून घरात वाद निर्माण होऊ शकतात. चाणक्य नीतीनुसार, अशा लोकांपासून सावध राहणं आवश्यक मानलं जातं.

फक्त गरजेपुरते आठवण काढणारे लोक

काही लोक फक्त स्वतःचं काम असेल तेव्हाच संपर्क साधतात. काम पूर्ण झालं की, ते पुन्हा दिसेनासे होतात. अशा नात्यांमध्ये प्रामाणिकपणा कमी असतो, असं मानलं जातं. चाणक्यांच्या मतानुसार, अशा व्यक्तींना आयुष्यात खूप जवळ स्थान दिल्यास मानसिक त्रास वाढू शकतो.

दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणारे लोक

सगळ्यात धोकादायक स्वभाव म्हणजे दुसऱ्यांच्या संकटात आनंद शोधणं. काही लोकांना दुसऱ्यांचं यश, आनंद किंवा प्रगती सहन होत नाही. अशा व्यक्ती सतत नकारात्मक ऊर्जा पसरवत असल्याचं पारंपरिक मानलं जातं. ज्योतिषशास्त्रीय आणि तात्त्विक मान्यतानुसार, अशा लोकांमुळे घरातील सकारात्मक वातावरणावर परिणाम होऊ शकतो.

चाणक्यांचा संकेत नेमका काय सांगतो?

चाणक्य नीतिमध्ये माणसांच्या स्वभावाची ओळख करून योग्य संगत निवडण्यावर भर दिला आहे. प्रत्येक व्यक्ती वाईटच असते असं नाही; मात्र काही स्वभाव वैशिष्ट्यांमुळे नात्यांमध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणालाही आयुष्यात किंवा घरात खूप जवळ करण्याआधी त्यांचा स्वभाव नीट ओळखणं आवश्यक मानलं जातं.

घरात सुख, समाधान आणि शांतता टिकवायची असेल, तर फक्त चांगल्या माणसांचीच साथ निवडा, असा संदेश चाणक्यांच्या नीतीमधून दिला जातो.