Chanakya Niti Relationship Advice for Husbands and Married Life Tips: लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रत्येक जोडप्यासाठी खास असतात. प्रेम, काळजी, नवीन स्वप्नं आणि एकमेकांना समजून घेण्याचा तो काळ असतो; पण अनेकदा नकळत बोललेले काही शब्द हळूहळू नात्यात कटुता निर्माण करू लागतात. सुरुवातीला छोट्या वाटणाऱ्या गोष्टीच पुढे मोठ्या वादाचं कारण ठरू शकतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतिमध्ये वैवाहिक आयुष्याबाबत काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना विचार करायला भाग पाडतात.

चाणक्य यांच्या मते, नवरा-बायकोचं नातं हे फक्त प्रेमावर नाही, तर विश्वास, आदर आणि समजुतीवर टिकून असतं. पण काही शब्द असे असतात, जे वारंवार बोलले गेले, तर नात्यात हळूहळू दुरावा निर्माण होऊ शकतो. इतकंच नाही, तर जोडीदार भावनिकदृष्ट्या एकटा पडू लागल्यास नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होण्याची शक्यताही वाढू शकते, असं मानलं जातं.

चाणक्य नीतीनुसार, पत्नीला “तू कोणत्याच गोष्टीत चांगली नाहीस” असं वारंवार बोलणं नात्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. तिचं स्वयंपाक करणं, दिसणं, घर सांभाळणं किंवा मुलांची काळजी घेणं यावर सतत टीका केली गेली, तर तिचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. अशा शब्दांमुळे ती स्वतःच्या घरातही दुर्लक्षित असल्याची भावना अनुभवू शकते.

त्याशिवाय पत्नीची तुलना दुसऱ्या महिलेशी करणंही नात्यासाठी धोकादायक मानलं जातं. “ती तुझ्यापेक्षा चांगली दिसते”, “ती किती समजूतदार आहे” किंवा “तू तिच्यासारखी का नाहीस?” अशा वाक्यांमुळे नात्यात असुरक्षितता आणि राग वाढू शकतो. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची वेगळी ओळख असते आणि त्याचा आदर करणं महत्त्वाचं मानलं जातं.

चाणक्य पुढे सांगतात, “तू नेहमीच चुकीचं करतेस” किंवा “तुझ्याकडून काहीच नीट होत नाही”, असे शब्दही नात्यात नकारात्मकता वाढवू शकतात. चुकांवर चर्चा करणं वेगळं; पण सतत अपमानास्पद भाषा वापरणं वेगळं. गोड आणि आदरानं बोललेले शब्द नातं मजबूत करू शकतात; तर कठोर शब्द मनात खोल जखम निर्माण करू शकतात.

काही वेळा नवरा पत्नीच्या मतांकडे किंवा भावनांकडे दुर्लक्ष करतो. मात्र चाणक्य यांच्या मते, नातं टिकवण्यासाठी दोघांच्याही विचारांना समान महत्त्व असणं गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला सतत दुर्लक्षित केलं गेलं, तर ती भावनिकदृष्ट्या दूर जाऊ शकते.

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे रागाच्या भरात बोललेले शब्द. “तुझ्याशी लग्न करून चूक झाली” किंवा सतत घटस्फोटाची धमकी देणं नात्यात भीती आणि असुरक्षितता निर्माण करू शकतं. अशा गोष्टी जरी रागात बोलल्या गेल्या तरी त्याचा परिणाम मनावर दीर्घकाळ राहू शकतो.

दरम्यान, चाणक्य नीतीध्ये सांगितलेल्या या गोष्टी सामाजिक आणि पारंपरिक विचारांवर आधारित मानल्या जातात. प्रत्येक नातं वेगळं असतं आणि संवाद, विश्वास व परस्पर आदर हेच कोणत्याही नात्याचं खरं बळ मानलं जातं.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)