Chanakya Niti Teachings on Decision Making : आचार्य चाणक्य यांनी आपले जीवन सुखी, समाधानी व सुंदर बनवण्यासाठी अनेक लहान सहान बारकावे सांगितल्याचे मानले जाते. आचार्यांचे हे बोध आज जगभरात चाणक्य नीती रूपात प्रसिद्ध आहेत. जर तुम्ही तुमच्या जीवनात चाणक्य नीतीच्या काही तत्त्वांचा अवलंब केला. तर तुमचा यशाचा मार्ग आणखीन सोपा होऊ शकतो. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात. तर आज आम्ही चाणक्य नीतीमधील असे तीन श्लोक सांगणार आहोत, जे तुम्हाला जीवनात यश मिळवण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करू शकतात.

१. निर्णय घेताना पुढील गोष्टी ठेवा लक्षात

“न स्नेहात् कृत्वा विघ्नं न द्वेषात् न च लोभतः।
न मोहत् कार्यमत्यन्तं कार्यं कार्यवदाचरेत्”

या श्लोकात, आचार्य चाणक्य सांगतात की, कोणतेही कार्य स्नेह (प्रेम, द्वेष, लोभ) किंवा मोहापोटी करू नये. तर ते केवळ कर्तव्य म्हणून निःपक्षपातीपणे आणि विवेकबुद्धीने केले पाहिजे. कोणतेही काम किंवा निर्णय घाईघाईत न घेता विचारपूर्वक घ्यावा. एकदा निर्णय घेतल्यावर त्यावर ठाम राहावे. म्हणजे तो निर्णय योग्य ठरेल आणि त्याचे चांगले परिणाम दीर्घकाळ टिकतील.

२. ही चूक करू नका

यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिषेवते ।
ध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव हि ।।

या श्लोकात, आचार्य चाणक्य म्हणतात की, जो मनुष्य स्थिर गोष्टी सोडून अस्थिर गोष्टींच्या मागे धावतो, तो आपल्या आयुष्यात स्थिर गोष्टींपासून मिळणारे लाभही गमावून बसतो आणि शेवटी काहीच उरत नाही. अशा परिस्थितीत, मनुष्याने नेहमी हेच लक्षात ठेवूनच कोणताही निर्णय घ्यावा. जेणेकरून तो वाईट परिणाम टाळू शकेल.

३. अशा प्रकारे यश प्राप्त होते

प्रभूतंकार्यमल्पंवातन्नरः कर्तुमिच्छति।
सर्वारंभेणतत्कार्यं सिंहादेकंप्रचक्षते॥

आचार्य चाणक्य सांगतात की, जीवनात यश मिळवायचे असेल तर माणसाने आपल्या ध्येयावर ठाम राहिले पाहिजे. अडचणी आल्या तरी हार न मानता सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास ध्येय नक्कीच गाठता येते. सिंहाचे उदाहरण देऊन ते म्हणाले की, ज्याप्रमाणे सिंह आपल्या ध्येयाप्रती आक्रमक असतो, त्याचप्रमाणे मनुष्यानेही आपल्या ध्येयाप्रती आक्रमक असले पाहिजे. ज्याप्रमाणे सिंह एकाग्रतेने आपल्या भक्ष्यावर नजर ठेवतो, त्याचप्रमाणे मनुष्यानेही आपले ध्येय साध्य करण्यासाठी नेहमी एकाग्र राहिले पाहिजे.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)