Chanakya niti : आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात मानवी जीवन सोपे करण्यासाठी अनेक नियम सांगितले आहेत. असे म्हटले जाते की, चाणक्यांचे नियम आजही प्रासंगिक आहेत आणि लोक यशाचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्याच मार्गांवर चालतात. चाणक्यांचे नियम थोडे कठीण असतात त्यामुळे प्रत्येकाला पालन करणे कठीण जाते. पण, एका श्लोकात आचार्य चाणक्य स्पष्ट करतात की, अशा दोन गोष्टी आहेत ज्या माणसाच्या सर्वात मोठी संपत्ती आणि खरा मित्र आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.
श्लोक
“कामधेनुगुणा विद्या ह्यकाले फलदायिनी।
प्रवासे मातृसदृशी विद्या गुप्तं धनं स्मृतम्॥”
श्लोकाचा अर्थ
आचार्य चाणक्यांच्या मते, शिक्षण आणि ज्ञान ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. खरा मित्र आणि पैसा ज्याप्रमाणे संकटाच्या वेळी मदत करतात, त्याचप्रमाणे ज्ञानही कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. त्यामुळे आयुष्यात ज्ञान मिळवणे खूप महत्त्वाचे आहे.
श्लोकानुसार, आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की, कामधेनू गायीप्रमाणे ज्ञान प्रत्येक इच्छा पूर्ण करते आणि गरजेच्या वेळीही फळ देते. परदेशात किंवा घरापासून दूर असताना ज्ञान आईप्रमाणे रक्षण करते आणि म्हणूनच ज्ञानाला गुप्त संपत्ती म्हटले जाते.
श्लोकाचा सोप्या भाषेतील अर्थ
संकटाच्या वेळी ज्ञान आणि बुद्धी माणसाला योग्य मार्ग दाखवतात. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही. तेव्हा आपले ज्ञानच अडचणीतून बाहेर पडण्यास मदत करू शकते. म्हणूनच, प्रत्येकाने सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
