Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीती आजही तितक्याच महत्त्वाच्या मानल्या जातात. चाणक्यांच्या नीतींचे पालन करणे सोपे नसते, असे म्हटले जाते. मात्र, जो त्यांचे पालन करतो त्याला यश नक्की मिळते. आपल्या नीतींमध्ये चाणक्यांनी मानवी जीवन अधिक सोपे आणि योग्य पद्धतीने जगण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

अनेकदा लोक कोणावरही पटकन विश्वास ठेवतात, पण नंतर त्यांना त्याचा पश्चात्ताप होतो. कारण ज्याच्यावर माणूस विश्वास ठेवतो, तोच स्वतःच्या स्वार्थासाठी विश्वासघात करतो. आचार्य चाणक्यांनी एका श्लोकातून सांगितले आहे की, कोणत्या लोकांवर किंवा गोष्टींवर कधीही पूर्ण विश्वास ठेवू नये. जाणून घेऊया आजची चाणक्य नीती.

श्लोक:

नदीनां शस्त्रपाणीनां नखीनां शृङ्गिणां तथा।

विश्वासो नैव कर्तव्यः स्त्रीषु राजकुलेषु च॥

श्लोकाचा अर्थ:

चाणक्यांच्या मते, नद्या, शस्त्र हातात असलेले लोक, मोठी नखे किंवा पंजे असलेले हिंस्र प्राणी (जसे सिंह, चित्ता), मोठी शिंगे असलेले प्राणी (जसे सांड, बैल), स्त्रिया आणि राजघराणे किंवा सत्ताधारी लोक यांच्यावर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नये.

श्लोकाचं सार:

आचार्य चाणक्य यांच्या मते, मोठे पंजे किंवा नखे असलेल्या हिंस्र प्राण्यांपासून नेहमी सावध राहावे. ते कधी कोणावर हल्ला करतील, याचा काही नेम नसतो. तसेच ज्या नद्यांचे काठ मजबूत नसतात, त्या कधीही रौद्र रूप धारण करू शकतात किंवा आपला प्रवाह बदलू शकतात. त्यामुळे अशा नदीवर पूर्ण विश्वास ठेवू नये. म्हणूनच नदीकाठी राहणाऱ्या लोकांना अनेकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

चाणक्यांच्या मते, मोठी शिंगे असलेल्या सांड किंवा बैलासारख्या प्राण्यांवरही विश्वास ठेवू नये. त्यांचा स्वभाव कधी बदलून ते आक्रमक होतील, हे सांगता येत नाही. ज्याच्या हातात तलवार किंवा इतर शस्त्र असते, त्याच्यावरही सहज विश्वास ठेवू नये. कारण तो रागाच्या भरात कोणतीही आक्रमक कृती करू शकतो.

चाणक्य म्हणतात की, चंचल स्वभावाच्या स्त्रीवरही पूर्ण विश्वास ठेवू नये. तिच्या स्वभावामुळे कधीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच, राजाशी संबंधित अधिकारी, सेवक किंवा राजघराण्यातील व्यक्तींवरही पूर्ण विश्वास ठेवू नये. कारण ते राजाच्या आदेशासाठी कोणाच्याही हिताचे किंवा अहिताचे काम करू शकतात. चाणक्यांचे मत आहे की, अशा लोकांसाठी नातेसंबंधांपेक्षा राजाचे नियम आणि त्यांच्याप्रती असलेली निष्ठा अधिक महत्त्वाची असते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)