Chanakya Niti: जीवनात सर्वात जास्त वेदना तेव्हा होतात, जेव्हा एखादा परका नाही तर आपलाच माणूस आपल्या विरोधात उभा राहतो. विशेषतः तो व्यक्ती आपला सख्खा भाऊ असेल, तर हे दुःख आणखी मोठं असतं. ज्या भावासोबत आपण लहानाचे मोठे झालो, एकाच घरात आनंदाचे क्षण घालवले आणि आई-वडिलांचे प्रेम मिळवले, तोच जर मालमत्ता, पैशांचा व्यवहार किंवा कौटुंबिक वादामुळे आपल्या विरोधात उभा राहिला, तर मनाला मोठा धक्का बसतो. अशा वेळी आचार्य चाणक्य यांच्या नीती आपल्याला भावनांमध्ये न अडकता शहाणपणाने निर्णय घ्यायला शिकवतात.

चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की अशा परिस्थितीचा सामना तुम्ही ५ प्रकारे करू शकता. चला जाणून घेऊया, आपलाच भाऊ विरोधात उभा राहिला तर काय करावे…

आचार्य चाणक्य यांच्या मते, आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नये. नाती ही त्यांच्या जागी असतात आणि स्वार्थ त्याच्या जागी असतो. अनेकदा तुमचा भाऊ तुमच्यावर प्रेम करत असतो, पण स्वतःचा फायदा जपण्यासाठी तो तुमच्या विरोधात निर्णय घेऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की तो तुमचा द्वेष करतो. त्यामागे त्याचे काही स्वार्थ किंवा काही अडचणी असू शकतात. त्यामुळे भावनांमध्ये वाहून जाण्यापेक्षा परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा.

जेव्हा आपलाच भाऊ विरोधात उभा राहतो, तेव्हा माणूस भावनिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकतो. अशा वेळी काही लोक स्वतःचा हक्क सोडून देतात, तर काही जण रागाच्या भरात नातं कायमचं तोडून टाकतात. चाणक्य नीती सांगते की कठीण प्रसंगी संयम आणि विवेकाने वागले पाहिजे. गरजेपेक्षा जास्त माघारही घेऊ नका आणि अहंकारापोटी असे कोणतेही पाऊल उचलू नका, ज्याचा नंतर पश्चात्ताप होईल.

चाणक्य सांगतात की कोणताही वाद सोडवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला नेमकं काय हवं आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुमचा भाऊ जे मागत आहे, तीच त्याची खरी गरज असेलच असं नाही. त्यामुळे त्याच्याशी बोलताना त्याचं म्हणणं शांतपणे ऐका. अनेकदा समजुतीने आणि संवादातून असे मार्ग सापडतात, ज्यामुळे दोन्ही बाजूंचं नुकसान टाळता येतं.

आचार्य चाणक्य पुढे सांगतात की भावासोबत वाद झाला म्हणून फक्त नातं टिकवण्यासाठी स्वतःच्या योग्य हक्काचा त्याग करणं शहाणपणाचं नाही. सर्वप्रथम तुम्हाला नेमकं काय हवं आहे आणि कोणत्या गोष्टीवर तडजोड करता येणार नाही, हे ठरवा. जर वाद मालमत्ता किंवा पैशांच्या व्यवहाराशी संबंधित असेल, तर भावनांपेक्षा वस्तुस्थिती आणि कायदेशीर सल्ल्याच्या आधारावर निर्णय घ्या.

चाणक्य नीतीच्या शेवटी सांगितले आहे की प्रत्येक वादाचा अर्थ नातं संपलं असं नसतं. परिस्थिती योग्य असेल, तर वाद मिटल्यावर भावाशी मनमोकळेपणाने बोला. त्याच्या वागण्यामुळे तुम्हाला किती दुःख झालं, हे त्याला सांगा. मात्र, समोरची व्यक्ती वारंवार तुमचं नुकसान करत असेल, तर स्वतःचा सन्मान जपण्यासाठी योग्य अंतर ठेवणंही गरजेचं आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)