Chanakya Niti: आचार्य चाणक्य, ज्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावांनीही ओळखलं जातं, यांनी चाणक्य नीती हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला आहे. चाणक्य नीतीमध्ये अनेक अशा गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्या आर्थिक अडचणींचं कारण ठरू शकतात. घरात नकळत होणाऱ्या काही छोट्या चुका पैशांची कमतरता आणि गरिबीचं कारण बनू शकतात. या समस्यांपासून वाचण्यासाठी चाणक्यांनी काही महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. हे उपाय योग्य पद्धतीने पाळल्यास घरात माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आर्थिक अडचणीही दूर राहतात…

चाणक्य नीतीच्या तिसऱ्या अध्यायातील २१व्या श्लोकात अशा तीन गोष्टींचा उल्लेख आहे, ज्या देवी लक्ष्मीला प्रसन्न करतात. असं म्हटलं जातं की, ज्या घरात मूर्ख लोकांचा सन्मान केला जात नाही, जिथे अन्नाचा आदर केला जातो, धान्याचा साठा करून ठेवला जातो आणि जिथे पती-पत्नीमध्ये प्रेम असतं व भांडणं नसतात, अशा घरात देवी लक्ष्मी कायम वास्तव्य करतात.

आचार्य चाणक्य या श्लोकाचं स्पष्टीकरण करताना सांगतात की, जे लोक मूर्खांपेक्षा चांगल्या आणि ज्ञानी लोकांचा जास्त आदर करतात, त्यांना कधीही पैशांची कमतरता भासत नाही. जो व्यक्ती मूर्ख लोकांच्या सहवासात जास्त वेळ घालवतो, त्याचं विचार आणि वागणंही तसंच होतं. पण जर तुम्ही समजूतदार आणि आदरणीय व्यक्तींच्या सहवासात राहिलात आणि त्यांचा सन्मान केलात, तर तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, ज्याचा आयुष्यात फायदा होतो.

चाणक्य पुढे सांगतात की, ज्या घरात अन्नाचा आदर केला जातो, त्या घरावर नेहमी देवी-देवतांची कृपा राहते. आपल्याला अन्न मिळतं यासाठी नेहमी देवाचे आभार मानले पाहिजेत, कारण अनेक लोकांना अन्न मिळत नाही. त्यामुळे अन्नाचा नेहमी आदर केला पाहिजे. तसेच, जे लोक आपल्या घरात विविध प्रकारच्या धान्याचा साठा करून ठेवतात, त्यांच्या घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते.

चाणक्य म्हणतात की, ज्या घरात पती-पत्नीमध्ये प्रेम असतं आणि भांडणं होत नाहीत, त्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास असतो. पती-पत्नी प्रेमाने राहत असतील तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते, जी अनेक दोष दूर करते. कारण प्रेमापेक्षा मोठी शक्ती नाही. पण ज्या घरात नेहमी भांडणं होत असतात, त्या घरात माता लक्ष्मी कधीच राहत नाहीत आणि त्या घरातील लोकांची प्रगती थांबते. चाणक्यांच्या मते, ज्या घरात नेहमी शांततेचं वातावरण असतं, तिथेच देवी लक्ष्मीचं आगमन होतं. अशा घरातील लोक तणावमुक्त जीवन जगतात. त्यामुळे नातेसंबंधांचा नेहमी आदर केला पाहिजे.

आचार्य चाणक्यांच्या मते, लक्ष्मीच्या अनेक नावांपैकी एक नाव चंचला आहे. एका ठिकाणी कायम राहणं हा तिचा स्वभाव नाही. पण एकदा लक्ष्मी एखाद्या घरात आली, तर ती सहजासहजी ते घर सोडून जात नाही. त्यामुळे जो व्यक्ती समाधानी असतो, त्याला लक्ष्मीची वेगळी पूजा करण्याची गरज नसते. देवी लक्ष्मी स्वतःहून त्याच्या घरी येतात आणि त्या घरात व कुटुंबात कायम वास्तव्य करतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)