Chanakya Niti: मुलांच्या स्वभावावर, आत्मविश्वासावर आणि भविष्यात मोठा प्रभाव त्यांच्या आई-वडिलांचा असतो. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये सांगितले आहे की, मुलांचे भविष्य हे त्यांचे आई-वडील मुलांसमोर कसे वागतात, यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते.

मुलं ही कच्च्या मातीच्या घड्यासारखी असतात. त्यांना ज्या पद्धतीने आकार दिला जातो, त्याच पद्धतीने ते घडतात. आचार्य चाणक्य यांनी मुलांच्या संगोपनाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही पालकांसाठी उपयोगी ठरतात.

इतकंच नाही, तर पालकांच्या अशा काही चुका असतात ज्यामुळे मुलं मोठी झाल्यावर आपले संस्कार विसरू शकतात. यासाठी अनेकदा आई-वडिलांचे वागणेही कारणीभूत ठरते. चला जाणून घेऊया, चांगल्या पालकांनी मुलांसमोर कोणत्या गोष्टी करण्यापासून दूर राहावे.

मुलांसमोर खोटे बोलणे टाळावे

आचार्य चाणक्य सांगतात की, आई-वडिलांनी मुलांसमोर चुकूनही खोटे बोलू नये. कारण जर आई-वडीलच खोटे बोलत असतील, तर मुलंही त्यांच्याकडून तेच शिकतात.

याचा मुलांच्या मनावर चुकीचा परिणाम होतो. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीत काहीतरी लपवणे किंवा खोटे बोलणे शिकू शकतात. मुलांना नेहमी खरे बोलण्याची सवय लावावी. खोटे बोलणे चुकीचे आहे, हे त्यांना समजावून सांगावे. अगदी मजा म्हणूनही खोटे बोलू नये, असे त्यांना शिकवावे.

एकमेकांशी बोलताना आदर राखावा

आई-वडील अनेकदा एकमेकांशी बोलताना मोठ्या आवाजात बोलतात किंवा चुकीच्या शब्दांचा वापर करतात. काही वेळा एकमेकांना कमी दाखवण्यासाठी त्यांच्या चुका किंवा कमतरता इतरांसमोर सांगतात.

अशा वागण्याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलंही इतरांचा आदर करण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या भाषेत बोलायला शिकू शकतात.

मुलांना गरजेपेक्षा जास्त लाड करू नयेत

आई-वडिलांनी मुलांचे गरजेपेक्षा जास्त लाड करू नयेत. चाणक्य नीतीमध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे,

‘लालनाद् बहवो दोषास्ताडनाद् बहवो गुणाः। तस्मात्पुत्रं च शिष्यं च ताडयेन्न तु लालयेत्।’

याचा अर्थ असा आहे की, मुलांचे खूप जास्त लाड केल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक वाईट सवयी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मुलांना योग्य शिस्त लावणे गरजेचे आहे. यामुळे त्यांच्या चांगल्या सवयी आणि संस्कार विकसित होण्यास मदत होते.

मुलांच्या चुका दुर्लक्षित करू नयेत

अनेकदा आई-वडील मुलांवर खूप प्रेम करत असल्यामुळे त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मुलांना मोठी चूक करण्याचीही भीती वाटत नाही.

तुम्ही मुलांना ५ वर्षांपर्यंत भरपूर प्रेम आणि लाड द्यावेत. मात्र त्यानंतर त्यांनी केलेल्या कोणत्याही चुकीकडे दुर्लक्ष न करता त्यांना योग्य आणि अयोग्य काय आहे, हे समजावून सांगणे गरजेचे आहे.

मूल किशोरवयात आल्यानंतर त्याच्याशी मित्रासारखे वागावे. त्यामुळे ते आपल्या मनातील गोष्टी लपवण्याऐवजी आई-वडिलांशी मोकळेपणाने बोलतील आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापासून दूर राहतील.

जर तुम्हीही यापैकी कोणतीही चूक करत असाल, तर आजपासूनच तुमच्या या सवयी बदलण्याचा प्रयत्न करा. यामुळे मुलांना चांगले संस्कार आणि योग्य परवरिश मिळण्यास मदत होईल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)