Life Lessons from Chanakya Niti : चाणक्य नीती ही जीवनातील रहस्यांची गुरुकिल्ली मानली जाते. आचार्य चाणक्य, ज्यांच्या दूरदृष्टी, धोरणात्मक चातुर्य आणि तीक्ष्ण बुद्धीने एका संपूर्ण साम्राज्याचा पाया घातला, त्यांनी केवळ राजकारण आणि अर्थशास्त्रातच योगदान दिले नाही, तर मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर आपली मते स्पष्टपणे मांडली. चाणक्य नीती हा अशा तत्त्वांचा संग्रह आहे, जो व्यक्तीला आत्मपरीक्षण, आत्मसुधारणा आणि आत्मविकासाकडे मार्गदर्शन करतो. कौटुंबिक जीवन असो वा सामाजिक जीवन, शिक्षण असो वा आत्मशिस्त, चाणक्यांची शिकवण प्राचीन काळाप्रमाणेच आजही तितकीच प्रासंगिक आहे. चला, काही प्रमुख श्लोकांच्या माध्यमातून जाणून घेऊया की, चाणक्य नीती आजही तितकीच प्रासंगिक आणि समर्पक कशी आहे ते…

१. श्लोक

त्यजेद्धर्मं दयाहीनं विद्याहीनं गुरुं त्यजेत्।
त्यजेत्क्रोधमुखीं भार्यां निःस्नेहान्बान्धवांस्त्यजेत्।।

आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या धर्मात दया आणि करुणा नाही. तो फक्त दिखावा ठरतो. त्याचप्रमाणे ज्ञान नसलेला गुरु, सतत रागावणारा जोडीदार आणि प्रेम व आपुलकी नसलेली नाती माणसाच्या आयुष्यात आनंद आणत नाहीत. त्यामुळे अशा गोष्टींपासून आणि नात्यांपासून दूर राहणेच योग्य आहे. आजच्या काळात अनेक ठिकाणी दिखावा जास्त आणि खरेपणा कमी दिसतो. चाणक्य सांगतात की, नात्यांची खरी किंमत प्रेम, आदर, सहकार्य आणि करुणेमुळे असते. एखाद्या नात्यात कायम वाद, राग आणि तणाव असेल. तर त्याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून आयुष्य ओझं वाटू लागेल अशी नाती जपण्यापेक्षा त्यापासून योग्य अंतर ठेवणे अधिक शहाणपणाचे ठरते.

२. श्लोक

यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निर्घषणच्छेदनतापताडनैः।
तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा।।

आचार्य चाणक्य म्हणतात, जसं सोनं घासून, कापून, तापवून आणि ठोकून त्याची शुद्धता तपासली जाते. तसंच माणसाची खरी ओळख त्याच्या त्याग, चांगल्या स्वभाव, गुण आणि कर्मांवरून ठरते. आजच्या काळात अनेकदा लोक एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन तिचे कपडे, पैसा किंवा सामाजिक दर्जा पाहून करतात. पण चाणक्य सांगतात की, माणसाचं खरं व्यक्तिमत्त्व कठीण परिस्थितीतच दिसून येतं. संकटाच्या वेळी तो कसा वागतो, इतरांशी कसा वागतो आणि त्याची कृती कशी असते, यावरून त्याची खरी किंमत ठरते. म्हणूनच माणसाचं मूल्य त्याच्या बाह्य दिखाव्यामुळे नव्हे, तर त्याच्या चांगल्या विचारांमुळे, स्वभावामुळे आणि कर्मांमुळे ठरते.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)