Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील सर्वांत ज्ञानी आणि बुद्धिमान पुरुषांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ते केवळ एक महान शिक्षकच नव्हते, तर त्यांना मानवी स्वभावाचीही सखोल जाण होती. त्यांच्या ‘नीती’मध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत, ज्या आजही आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. या नीतीमध्ये, चाणक्यांनी समाजात एखाद्या व्यक्तीला सतत अपमान का सहन करावा लागतो, याची काही कारणेही सांगितली आहेत. जेव्हा असे वारंवार घडते, तेव्हा लोक आपल्या नशिबाला किंवा समोरच्या व्यक्तीला दोष देऊ लागतात.
पण आचार्य चाणक्य म्हणतात की, जर कोणी आपला वारंवार अपमान करत असेल, तर त्याचा अर्थ असा नाही की ते चुकीचे आहेत. कधी कधी, आपल्या स्वतःच्या सवयींमुळेच आपला अपमान होतो. ते म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीने या सवयी आणि चुका वेळेवर सुधारल्या, तर ती व्यक्ती समाजात आणि आपल्या प्रियजनांमध्ये पुन्हा आदर मिळवू शकते. अशाच चुका आणि सवयींविषयी सविस्तर जाणून घेऊ…
१) इतरांपुढे सतत झुकून राहणं
आचार्य चाणक्यांच्या मते, जर एखादी व्यक्ती सतत इतरांना खूश करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर इतर लोक तिला गृहीत धरू लागतात. अति नम्रता हा अनेकदा एक दोष मानला जातो. अशा व्यक्ती आपल्या भावना इतरांसमोर मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाहीत आणि परिणामी, समाजात त्यांचा आदर हळूहळू कमी होतो. प्रत्येक नात्यात आत्मसन्मान न जपला जाण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
२) कमकुवतपणा सर्वांना सांगणे
काही लोक विचार न करता, आपल्या कमकुवतपणा आणि समस्या इतरांना सांगतात. आचार्य चाणक्यांच्या मते, हे शहाणपणाचे नाही. शहाणा माणूस तोच असतो, जो आपला कमकुवतपणा इतरांसमोर कधीही उघड होऊ देत नाही. जेव्हा चुकीच्या लोकांना तुमचा कमकुवतपणा कळतो, तेव्हा ते त्याचा तुमच्याविरुद्ध शस्त्र म्हणून वापर करतात. इतकेच नाही, तर कधी कधी लोक त्यावरून थट्टासुद्धा करू लागतात. जर तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती देणार असाल, तर ती व्यक्ती विश्वासार्ह आहे ना याची प्रथम खात्री करून घ्या.
३) वाईट संगत
एखाद्या व्यक्तीची खरी ओळख त्याच्या मित्रांवरून आणि तो कोणाच्या संगतीत राहतो यावरून कळते. जर तुम्ही सतत अशा लोकांच्या संगतीत राहिलात, जे इतरांची चेष्टा करतात, खोटे बोलतात किंवा अयोग्य वर्तन करतात, तर इतर लोकही तुमच्याकडे त्याच दृष्टीने पाहू लागतील. चाणक्य नीतीनुसार, माणसाची संगतच त्याला समाजात आदर मिळवून देण्यास मदत करते. मात्र, वाईट संगत केवळ अनादरास कारणीभूत ठरते.
४) विचार न करता बोलण्याची सवय
काही लोकांना रागाच्या भरात किंवा घाईगडबडीत विचार न करता बोलण्याची सवय असते. या सवयीमुळे त्यांना दीर्घकाळ अडचणींना सामोरे जावे लागते. आचार्य चाणक्य म्हणतात की, शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते. चुकीच्या पद्धतीने बोललेले शब्द नातेसंबंध बिघडवू शकतात आणि तुमच्याबद्दल अनादराची भावना वाढवू शकतात. हेच एक प्रमुख कारण आहे की, काहीही बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करण्याची सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे.
(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
