Chanakya Niti: लग्नाचं नातं हे फक्त दोन व्यक्तींचं नसतं, तर प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणाचं अतूट नातं असतं. आजकाल अनेकदा पती-पत्नीमध्ये पूर्ण पारदर्शकता असावी आणि एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवू नये, असा सल्ला दिला जातो. मात्र, महान कूटनीतिज्ञ आचार्य चाणक्य यांचे या विषयावर थोडे वेगळे विचार होते.

चाणक्य नीतीनुसार, तुमचं वैवाहिक जीवन कितीही सुखी असलं तरी काही गोष्टी अशा असतात ज्या स्वतःपुरत्या ठेवण्यातच शहाणपण असतं. या गोष्टी लपवण्यामागचा उद्देश कोणाची फसवणूक करणे नसून, नात्यातील शांतता टिकवून ठेवणे हा आहे. चला तर मग जाणून घेऊया, चाणक्यांच्या मते अशा कोणत्या ४ गोष्टी आहेत ज्या लपवून ठेवण्यातच फायदा आहे.

१. दानधर्म केल्याचं सांगू नका

सनातन धर्मात दानाला अतिशय पवित्र मानलं जातं. मात्र, ते निस्वार्थ भावनेने केलं जाणं महत्त्वाचं आहे. चाणक्य म्हणतात की, जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीची मदत केली असेल, तर त्याचा उल्लेख पत्नी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसमोर करू नये. दान केल्याचं दाखवणं किंवा त्याचा गवगवा केल्याने त्याचं खरं पुण्य कमी होतं.

२. अपयश किंवा अपमानाचं दुःख सतत सांगू नका

नोकरी किंवा व्यवसायात चढ-उतार येत असतात. चाणक्य नीतीनुसार, जर कामात मोठं नुकसान झालं असेल किंवा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला असेल, तर त्याचा संपूर्ण भार लगेच आपल्या जीवनसाथीवर टाकू नये. यामुळे कुटुंबात विनाकारण तणाव वाढू शकतो. आधी स्वतः परिस्थिती समजून घ्या, मानसिकदृष्ट्या मजबूत व्हा आणि योग्य वेळी याबाबत चर्चा करा.

३. आपली सर्वात मोठी कमजोरी कधीही सांगू नका

जीवनसाथीसोबत तुमचं नातं कितीही मजबूत असलं तरी आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कमजोरी किंवा मनातील खोल भीती त्यांच्यासमोर उघड करणं टाळावं. चाणक्य नीतीनुसार, अनेकदा वाद किंवा भांडणाच्या वेळी रागाच्या भरात तुमचा पार्टनर त्याच कमजोरीचा वापर तुम्हाला टोमणे मारण्यासाठी करू शकतो. यामुळे तुम्हाला मनापासून वाईट वाटू शकतं.

४. आपल्या संपूर्ण बचतीची माहिती देऊ नका

घराचा खर्च पती-पत्नीने मिळून चालवणं चांगली गोष्ट आहे. मात्र, चाणक्य नीतीमध्ये पैशांची बचत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यांच्या मते, आपली गुप्त बचत किंवा भविष्यासाठी बाजूला ठेवलेल्या पैशांचा पाई-पाईचा हिशोब सांगणं आवश्यक नाही. यामागचं मुख्य कारण म्हणजे विनाकारण पैसे खर्च होऊ नयेत आणि कठीण काळात तुमच्याकडे एक मजबूत आर्थिक आधार तयार असावा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)