Chanakya Enemy Strategy: जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी शत्रू, विरोधक किंवा आपलं वाईट पाहणारे लोक भेटतात. काही लोक समोरून गोड बोलतात, पण पाठीमागून नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी नेमकं कसं वागावं, कोणावर विश्वास ठेवावा आणि शत्रूला कसं हरवावं याबाबत अनेक लोक गोंधळून जातात. पण, हजारो वर्षांपूर्वी आचार्य चाणक्य यांनी यावर अतिशय प्रभावी उपाय सांगून ठेवले आहेत. विशेष म्हणजे, आजच्या काळातही त्यांच्या या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या मानल्या जातात.
आचार्य चाणक्य यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावांनीही ओळखलं जातं. त्यांच्या नीती आजही राजकारण, व्यवसाय, नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनात मार्गदर्शक मानल्या जातात. विशेष म्हणजे, शत्रूशी कसं वागावं आणि कठीण परिस्थितीत स्वतःचं रक्षण कसं करावं याबाबत त्यांनी दिलेल्या शिकवणी आजही लोक आवर्जून वाचतात.
चाणक्य म्हणतात की शत्रूला कधीही कमजोर समजू नये, कारण शत्रूचं एकच लक्ष्य असतं आणि ते म्हणजे समोरच्या व्यक्तीचं नुकसान करणं. त्यामुळे जी व्यक्ती शत्रूला हलक्यात घेते, ती अनेकदा अडचणीत सापडते, म्हणूनच प्रत्येक वेळी सावध राहणं खूप महत्त्वाचं असल्याचं चाणक्य सांगतात.
चाणक्यांच्या नीतीमध्ये एक महत्त्वाचा श्लोक सांगितला आहे:
‘अनुलोमेन बलिनं प्रतिलोमेन दुर्जनम्।
आत्मतुल्यबलं शत्रु: विनयेन बलेन वा।।’
या श्लोकाचा अर्थ असा की, जर शत्रू तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली असेल तर त्याच्याशी त्याच्या स्वभावानुसार वागलं पाहिजे. जर समोरची व्यक्ती कपटी किंवा दुष्ट स्वभावाची असेल तर तिच्यावर मात करण्यासाठी वेगळी रणनीती आखावी लागते. तसेच जर शत्रू तुमच्याइतकाच ताकदवान असेल तर विनय, बुद्धी आणि योग्य वेळी दाखवलेली ताकद यामुळे त्याला हरवता येतं.
चाणक्यांच्या मते, शत्रूशी सामना करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. अनेक लोक रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतात आणि त्याचाच फायदा विरोधक घेतात, त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती असली तरी शांत राहणं आवश्यक आहे. संयमामुळे योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते.
याशिवाय, कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी योग्य वेळेची वाट पाहणंही गरजेचं आहे. घाईत घेतलेले निर्णय अनेकदा नुकसान करून जातात, त्यामुळे शत्रूविरोधात कारवाई करताना मजबूत योजना आणि योग्य वेळ खूप महत्त्वाची मानली जाते.
चाणक्य पुढे सांगतात की, प्रत्येक लढाई एकट्याने जिंकता येत नाही. काही वेळा इतरांची मदत घेणं आवश्यक असतं, त्यामुळे मदत मागण्यात कमीपणा वाटून घेऊ नये. योग्य लोकांची साथ असेल तर मोठ्या संकटातूनही सहज बाहेर पडता येतं.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शत्रूची कमजोरी ओळखणं. जी व्यक्ती समोरच्याची कमजोरी समजून घेते, तिला विजय मिळवणं सोपं जातं. मात्र, स्वतःची कमजोरी कोणासमोरही उघड करू नये, असंही चाणक्य स्पष्ट सांगतात.
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात चाणक्यांच्या या गोष्टी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत, म्हणूनच शत्रू कितीही बलवान असला तरी योग्य बुद्धी, संयम आणि रणनीती असेल तर कोणतीही लढाई जिंकता येते, हे चाणक्यांनी खूप आधीच सांगून ठेवलं आहे.
