Rules to Change Your Work Habits : सध्याच्या धावपळीच्या जगात मागे पडू नये म्हणून प्रत्येक जण रात्रंदिवस मेहनत करतो, नवीन कौशल्ये शिकतो, यश मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण, कधी कधी एवढे प्रयत्न करूनही प्रत्येकाला अपेक्षित यश मिळत नाही. तसेच यश नक्की का मिळत नाही यामागचे कारणही कळून येत नाही. त्यामुळे स्वतःचा राग येतो.
पण, प्रश्न केवळ मेहनतीचाच नाही, तर योग्य योजना आखून, त्यानुसार वाटचाल करण्याचादेखील असतो. या गोष्टी लक्षात घेऊन आचार्य चाणक्यांनी यश मिळविण्यासाठी काही कठोर नियम घालून दिले, जे आजच्या जगात यशाच्या स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठीदेखील योग्य आहेत. चला, आचार्य चाणक्यांकडून अशा तीन गोष्टी शिकूया, ज्या तुमच्या विचारसरणीत आणि कार्य करण्याच्या पद्धतीत परिवर्तन घडवून आणू शकतात.
श्लोक
तदहं संप्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्यया।
येन विज्ञानमात्रेण सर्वज्ञत्वं प्रपद्यते।।
या श्लोकात आचार्य चाणक्य सांगतात की, ते लोकांच्या कल्याणासाठी राजकारण, नीती आणि व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे ज्ञान देत आहेत. हे ज्ञान समजून घेतल्यास माणसाला जीवनातील अनेक परिस्थिती योग्य प्रकारे समजून घेता येतात आणि त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
चाणक्यांनी सांगितले तीन नियम
मनसा चिन्तितं कार्यं वाचा नैव प्रकाशयेत्
मन्त्रेण रक्षयेद् गूढं कार्ये चापि नियोजयेत्।।
म्हणजेच मनात आलेल्या एखाद्या कार्याचा विचार लगेच बोलून दाखवू नये. त्यावर काळजीपूर्वक विचार करून, तो गुप्त ठेवावा आणि योग्य वेळ येताच मौन बाळगून, त्या विचाराचे कृतीत रूपांतर करावे.
इन्द्रियाणि च संयम्य बकवत् पण्डितो नर:।
देशकालबंल ज्ञात्वा सर्वकार्याणि साधयेत्।।
बगळ्याप्रमाणे शांत आणि एकाग्र राहून योग्य त्या वेळेची वाट पाहावी. स्वतःच्या क्षमतेचा विचार करून योग्य ती संधी साधावी आणि मग आपल्या कार्याला यशस्वीपणे पूर्णत्वास न्यावे.
परस्परस्य मर्माणि ये भाषन्ते नराधमा:।
त एवं विलयं यान्ति वल्मीकोदरसपर्वत्।।
जी व्यक्ती दुसऱ्यांची गुपिते इतरांना सांगते, ती तुमची गुपितेही सुरक्षित ठेवेलच, असे नाही. त्यामुळे अशा व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये.
भारतीय इतिहासात ‘चाणक्य नीती’ची एक अत्यंत प्रभावशाली ग्रंथ म्हणून ख्याती आहे. हा ग्रंथ जीवन, राजकारण, समाज, पैसा आणि यश यांची रहस्ये सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने समजावून सांगण्यास मदत करतो. आचार्य चाणक्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूविषयी निश्चितच असे काहीतरी सांगितले आहे, जे आज जितके प्रभावशाली आहे आणि तितकेच ते भविष्यातही राहील.
