Fix These 4 Weaknesses : आचार्य चाणक्य हे केवळ एक महान राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ नव्हते, तर मानवी स्वभावाचे ते उत्तम जाणकार होते. त्यांनी आपल्या ‘चाणक्य नीती’ ग्रंथामध्ये सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अनेक महत्त्वाचे सूत्रे सांगितली आहेत. या नीतीमध्ये माणसाच्या अशा काही सवयींचे वर्णन आहे, ज्यामुळे इतर लोक त्यांचा गैरफायदा घेऊ शकतात. जर तुम्ही या कमतरता सुधारल्या, तर तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता आणि इतरांकडून होणारा त्रासही टाळू शकता. चला तर त्याचबद्दल या बातमीतून जाणून घेऊयात…
श्लोक १
नात्यन्तं सरलैर्भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम् ।
छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः॥
चाणक्य नीतीमधील हा श्लोक सांगतो की, माणसाने खूप सरळमार्गी किंवा एकदम भोळं असू नये. याबद्दल उदाहरण देताना चाणक्य म्हणतात की, जंगलात सरळ झाडे आधी तोडली जातात आणि वाकडी झाडे टिकून राहतात. त्याचप्रमाणे, आजच्या काळात भोळ्या लोकांचाच सर्वाधिक गैरफायदा घेतला जातो.
श्लोक २
अर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्चरितानि च।
वञ्चनं चापमानं च मतिमान्न प्रकाशयेत्।।
चाणक्य नीतीनुसार, तुम्ही तुमची गुपिते किंवा योजना इतरांना कधीही सांगू नयेत. ही सवय तुमच्या विनाशास कारणीभूत ठरू शकते. आचार्य चाणक्य म्हणतात की, आर्थिक नुकसान, मानसिक त्रास, कौटुंबिक भांडण आणि अपमान या गोष्टी कोणाबरोबरही शेअर करू नयेत. विशेषतः तुमच्या योजना, इतरांना सांगितल्यास ते तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.
श्लोक ३
न स्नेहात् कृत्वा विघ्नं न द्वेषात् न च लोभतः।
न मोहत् कार्यमत्यन्तं कार्यं कार्यवदाचरेत्॥
कोणतेही काम करताना मनात प्रेम, द्वेष, लोभ किंवा मोह यांसारख्या भावना ठेवू नयेत. कारण अशा भावनांमुळे निर्णय घेताना पक्षपात होतो आणि चुकीचे परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी प्रत्येक काम “हे माझे कर्तव्य आहे” या भावनेने, निष्पक्षपणे आणि जबाबदारीने करावे. त्यामुळे हा श्लोक आपल्याला शिकवतो की भावनांवर आधारित निर्णय अनेकदा आपल्याला चुकीच्या दिशेला नेतात. जेव्हा आपण शांत, निष्पक्ष आणि कर्तव्यनिष्ठ राहतो, तेव्हा निर्णय अधिक योग्य होतात आणि इतरांना आपला गैरफायदा घेण्याची संधीही कमी होते.
श्लोक ४
यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिषेवते ।
ध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव हि ।।
आचार्य चाणक्य या श्लोकात सांगतात की, जो व्यक्ती स्थिर आणि खात्रीशीर गोष्टी सोडून अस्थिर किंवा अनिश्चित गोष्टींच्या मागे धावत. मग त्याला शेवटी दोन्हीही गोष्टी गमवाव्या लागतात. म्हणजेच त्याच्याकडे आधीच आहे तेही निघून जाते आणि तो ज्या गोष्टीच्या मागे धावतो तीही त्याला मिळत नाही. अशा स्थितीत त्या व्यक्तीचे दोन्ही बाजुंनी नुकसान होते.
