Chanakya Niti Lessons That Can Help You Achieve Success : आचार्य चाणक्य हे देशातील महान सल्लागारांपैकी एक मानले जातात. त्यांच्या तत्त्वांचे पालन केल्याने प्रत्येक कार्यात यश मिळते. चाणक्यांनी ‘चाणक्य नीती’ नावाचा एक महान ग्रंथही लिहिला आहे, जो तरुणांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. असे मानले जाते की, आचार्य चाणक्यांना केवळ पुस्तकी विषयांचेच नव्हे, तर जीवनाच्या सर्व पैलूंचेही ज्ञान होते. त्यांची तत्त्वे आजही प्रासंगिक आहेत. त्यामुळे आजही लोक संकटांवर मात करण्यासाठी या तत्त्वांचे पालन करतात. या नैतिक ग्रंथात तीन तत्त्वे आहेत, ज्यांचे पालन केल्यास व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यास आणि समाजात तिचा आदर वाढविण्यात मदत होते. चला, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
शान्तितुल्यं तपो नास्ति न सन्तोषात्परं सुखम्।
न तृष्णायाः परो व्याधिर्न च धर्मो दयापरः ।।
आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या या श्लोकाचा अर्थ असा आहे की, शांतीपेक्षा मोठी कोणतीच तपश्चर्या नाही, समाधानापेक्षा मोठे कोणतेच सुख नाही. त्यामुळे माणसाने नेहमी आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. ज्या व्यक्तीच्या मनात सतत काहीतरी मिळवण्याची इच्छा असते, त्या व्यक्तीला खरे सुख आणि समाधान मिळत नाही. माणसाच्या इच्छा आणि वासना एखाद्या अशा आजारासारख्या आहेत, ज्यामध्ये कितीही मिळाले तरी मनाची इच्छा किंवा भूक कधीच पूर्ण होत नाही. पण, इतरांशी प्रेमाने आणि करुणेने वागल्याने मनाला खरे समाधान मिळते.
मनसा चिन्तितं कार्यं वाचा नैव प्रकाशयेत्।
मन्त्रेण रक्षयेद् गूढं कार्ये चाऽपि नियोजयेत् ।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, मनात ठरवलेले काम कधीही इतरांना सांगू नये. असे काम नेहमी मनात ठेवून ते पूर्ण करण्याच्या इच्छेने काम करत राहावे. जीवनात सुखी राहण्यासाठी मनातील रहस्ये कोणालाही सांगू नयेत. अनेकदा काही लोक आपली ध्येये सर्वांसमोर सांगतात. पण, जेव्हा ती पूर्ण होत नाहीत, तेव्हा माणूस तणावाखाली येऊ लागतो. तसेच, समाजात त्यांची थट्टा केली जाते. यामुळे त्या व्यक्तीचा आत्मविश्वासही कमी होतो. म्हणून, व्यक्तीने नेहमी आपल्या योजना मनात ठेवूनच काम केले पाहिजे.
परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम् ।
वर्जयेत्तादृशं मित्रं विषकुम्भं पयोमुखम् ।।
नीती ग्रंथातील या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जे लोक तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान करतात, पण तुमच्यासमोर मात्र गोड बोलतात, अशा लोकांपासून दूर राहावे. आचार्य चाणक्यांच्या मते, केवळ गोड बोलतात म्हणून अशा लोकांवर विश्वास ठेवू नये. ते तुमच्या यशात अडथळे निर्माण करू शकतात आणि तुमचे नुकसानही करू शकतात. चाणक्य अशा मित्रांची तुलना अशा भांड्याशी करतात, जे बाहेरून दुधाने भरलेले दिसते; पण आतून त्यात विष असते. म्हणजेच, असे लोक वरून आपले आणि प्रेमळ वाटतात; पण मनातून मात्र तुमच्याबद्दल वाईट भावना ठेवतात.
